नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीतील अपूर्ण कामे त्वरित मार्गी लावा आणि येत्या २१ एप्रिल पासून जुन्या बिटको रुग्णालयातील ओपीडी येथे स्थलांतरित करून सुरु करा असा अल्टिमेटम पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पालिकेच्या स्थानिक अधिका-यांना दिले. नवीन आणि जुने बिटको रुग्णालयातील सर्वत्र पसरलेली अस्वच्छता बघून आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जुने बिटको रुग्णालयाचे स्थलांतर नवीन बिटको रुग्णालय इमारतीत केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बिटको रुग्णालयाची पाहणी करून येथील तयारी, सोयी सुविधांची पाहणी केली. आयुक्तांनी साडे पाच वाजता प्रथम जुने बिटको रुग्णालयातील ओपीडी, एकसरे विभाग, केसपेपर, औषधे वितरण खिडकी, नेत्र उपचार विभाग, लसीकरण विभाग, महिला प्रसूती विभाग, आयसीयु आदी विभागांना भेटी दिल्या. यावेळी कधी नव्हे ते झाडून सारे डॉक्टर्स उपस्थीत होते. मात्र एकही रुग्ण ओपीडीत नव्हता. त्यानंतर आयुक्तानी नवीन बिटको रुग्णालयात पाहणी केली. विविध विभागांची तयारी, येथील अस्वच्छता, बंद असलेले एमआरआय मशीन, सुरु असलेले बांधकाम, अपूर्णावस्थेतील लिफ्ट्स, अपूर्ण कामावर लावलेले पत्रे बघून आयुक्तांनी उपस्थित अधिका-यांची कानउघडणी केली. इथे कोणतीच तयारी नाही मग जुने बिटको रुग्णालय स्थलांतरित का करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अधिका-यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने कुणाचाच कुणात पायपोस नसल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आली. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा वापर जनतेसाठी झालाच पाहिजे, असे मत यावेळी आयुक्तांनी मांडले.
परंतु नवीन इमारतीत नागरिकांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होता कामा नये, त्यासाठी आवश्यक तयारी आगोदर करा आणि मगच जुने रुग्णालयाची ओपीडी स्थलांतरित करण्याची सुचना त्यांनी केली. येत्या १५ मे रोजी जुन्या रुग्णालयातील ऑपरेशन थियटर देखील स्थलांतरित करण्याचे त्यांनी आदेश दिले. वीज यंत्रणा, फायर ऑडीट, इतर देखभाल दुरुस्तीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे, स्वच्छतेसाठी एजन्सी नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले. उपस्थित काही नागरिकांनी बिटको रुग्णालयातील समस्या पालिका आयुक्तांपुढे मांडल्या. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, डॉ. आवेश पलोड, बिटको रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.नलिनी शार्दुल. डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ राजेंद्र भंडारी आदींसह बांधकाम, विद्युत, पाणी पुरवठा विभागाचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते.