नाशिकरोड – प्रेस व्यवस्थापनाने हुकूमशाही बंद करावी, कामाचा पारंपारिक ढाचा बदलू नये, नोट चोरी प्रकरणातील कामगारांचे निलंबन मागे घ्यावे, निर्णय घेताना मजदूर संघाला विश्वासात घ्यावे आदी मागण्यांसाठी नाशिकरोड करन्सी नोट प्रेस व आयएसपी प्रेस कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले होते. मात्र, व्यवस्थापनाने मागण्या मान्य करण्यांचे आश्वासन दिल्याने बेमुदत काम बंद आंदोलन आज मागे घेण्यात आले. तथापी, मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत फक्त जेवणाच्या सुटीत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी असोसिएशन या संघटनांनी घेतला आहे. ही माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली. खासदार हेमंत गोडसे यांनीही याप्रश्नी दिल्लीत प्रेस महामंडळाशी चर्चा केली.
रात्री उशिरापर्यंत नोट प्रेस व्यवस्थापन व आयएसपी मजदूर संघ यांच्यात बैठक झाली. युनियनशी चर्चा करून निर्णय घेतले जातील, कामगारांच्या सेवा शर्तींना धक्का लावणार नाही, नोट चोरी प्रकरणातील निलंबित कामगारांना लवकरच कामावर घेतले जाईल, असे आश्वासन सीएनपी प्रशासनाने दिले आहे. जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, सीएनपीचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, महाव्यवस्थापक एस. महापात्रा, सहाय्यक महाव्यवस्थापक वाजपेयी, नवीन कुमार, अर्पित धवल, दिपक पडवळ, स्टाफ युनियनचे सरचिटणीस अभिजित आहेर, दिपक शर्मा, मनोज चिमणकर हे बैठकीला उपस्थित होते.
जगदीश गोडसेंनी सांगितले की, बेमुदत काम बंद आंदोलन थांबवले असले तरी नोट प्रेसमधील विविध विषयांसह देशातील नऊ प्रेस युनिटमधील काही विषयांबाबत व्यवस्थापनाला नोटीस देण्यात आली आहे. त्याबाबत दिल्लीतील मुख्यालयासह स्थानिक व्यवस्थापनाला जागृत करून प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाची नवी रुपरेषा तयार करण्याचे नऊ युनिटच्या कामगार संघटनेच्या महासंघाने ठरवले आहे. नाशिकरोडच्या दोन्ही प्रेसच्या आत जेवणाच्या सुटीत घोषणा देत शांततेच्या मार्गाने व काळ्या फित लाऊन आंदोलन सुरुच राहणार आहे. आंदोलनात कामगारांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. मजदूर संघ कायमच प्रेस व कामगारांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिला व सकारात्मक भूमिका घेऊन काम केले. कामगारांकडून गरजेवळी जादा व विनामोबदला काम करण्याचे, रविवारी व अन्य सुटीच्या दिवशी कामावर येण्याचे, लोडिंग-अनलोडिंग ही कामेही मजदूर संघाने करून घेतली. आधुनिककरणाची भूमिका मांडून मजदूर संघाने नवीन मशिनरी व नवीन कामगार भरतीची मागणी करूनही व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतले नाही. प्रेसपुढे काय अडचणी येतील हे त्यांनी लक्षात घेतले नाही. महामंडळ होत असताना दोन्ही प्रेसची मिळून कामगार संख्या पाच हजार होती ती आज 2100 झाली आहे. असे असतानाही उत्पादन गेल्या वर्षापर्यंत वाढतेच होते. मजदूर संघाची सकारात्मकता व कामगारांची कामाची तयारी यामुळे हे शक्य होत गेले. आता जुन्या मशिनरी काम देत नाहीत, पुरेसे मनुष्यबळ नाही. त्याला कामगारांना जबाबदार धरणे योग्य नाही. व्यवस्थापनाने हे लक्षात न घेता कामगारांना दोष दिला. त्यावर उपाययोजना न करता कामगारांना क्षमतेपेक्षा जादा काम करण्यास सांगणे, धमकावणे, कामगार कॅडरमध्ये भरती झाला तर त्याला 30 वर्षाच्या सेवेनंतर नव्या कॅडरमध्ये जाण्यास भाग पाडणे यासारख्या गोष्टी नव्याने घडू लागल्याने कामगार तणावग्रस्त झाले होते. व्यवस्थापनाच्या दडपशाही व हटवादीमुळे असंतोष निर्माण झाला होता.