नाशिक – कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आल्याने नाशिककरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविली आहे. ४५ वर्षे वयापुढील ९४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असला तरी केवळ ५२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर, १८ ते ४४ वयोगटातील केवळ ६२ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, दुसरा डोस केवळ २८ टक्के जणांनीच घेतला आहे.
नाशिक शहर व परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी स्वतःचे लसीकरण करून घेऊन कोविड या आजारापासून आपले संरक्षण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मनपाच्या वतीने लसीकरण सुरुवातीपासूनच सुरू करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ४५ वर्षांच्या वरील ९४ टक्के लाभार्थींना पहिला डोस देण्यात आलेला असून त्यापैकी ५२ टक्के लाभार्थ्यांना दुसरा डोस सुद्धा देण्यात आलेला आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी दुसरा डोस हा त्यांच्या नियमित वेळेनुसार योग्य पद्धतीने तात्काळ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे.
१८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे.या वयोगटातील नागरिकांपैकी एकूण ६२ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला असून त्यापैकी २८ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत डोस अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तात्काळ नाशिक महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
कोविड लसीकरण सद्यस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून नाशिक शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व जगभरातून असे निदर्शनास आलेले आहे की लसीकरण झालेल्या नागरिकांना शक्यतो कोविडची बाधा होत नाही किंवा बाधा झाल्यास सदर रुग्णास रुग्णालयात सहसा भरती करण्याची आवश्यकता भासत नाही. यासोबतच भारतामध्ये कोविडचा परावर्तित झालेला नवीन विषाणू आढळून आलेला आहे. प्राप्त माहितीनुसार सदरचा विषाणूचा तीव्रतेने प्रसार होतो. तरी नाशिक शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सणासुदीच्या काळात त्यांनी मास्क वापरणे सोशल डिस्टंसिंग ठेवणे व सँनीटायझर नियमित वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब कायम केला पाहिजे जेणेकरून आपण सर्वजण कोविड पासून स्वतःचे व दुसऱ्यांचेही रक्षण करू शकू तरी सर्वांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केलेआहे.