नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट शॉप मधून खरेदी केलेले अथवा अन्य स्त्रोतामार्फत मिळविलेले व विदेशी प्रजातीचे वन्यजीव ज्यांची परिवेश प्रणालीवर नोंदणी झालेली नाही व ते वन्यजीव संरक्षण कायदा- 1927 अन्वये संरक्षण प्रदान करण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे वन्यजीव बाळगले असल्यास नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधून उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) नाशिक कार्यालयाकडे सपूर्द करावेत आवाहन उपनवसंरक्षक नाशिक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक शहरात विविध पेट शॉप येथे वनविभाग नाशिक (पश्चिम भाग) कार्यालयामार्फत धाडसत्र राबविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात कासव, पोपट, हेजहॉक इत्यादी वन्यजीवांचा साठा आढळून आला आहे. या पेटशॉपच्या मालकांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यामार्फत विक्री झालेल्या वन्यजीवांच्या ग्राहकांची माहिती सुद्धा घेण्यात आली आहे. व अशा ग्राहकांच्या घरी धाडसत्र राबविण्याची वनविभागाची तयारी सुरू आहे.
धाडसत्रात कोणत्याही नागरिकाकडे नोंदणीकृत नसलेले वन्यजीव आढळून आल्यास त्यांचेविरूद्ध सक्त कार्यवाही करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात वन्यजीव बाळगल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती पुरवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल, असेही उपनवसंरक्षक नाशिक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी शाासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.