नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या वर्षाचा पहिलाच महिना झाडांच्या बचावासाठी उघडपणे पुढे आलेल्या नाशिकच्या वृक्ष तथा पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आता राजकीय पटलावर, जो झाडे व पर्यावरणाला उघड पाठींदेतील त्यांनाच पर्यावरणप्रेमी जनतेचा निवडणूकीत पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद तथा अन्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूकीय पर्यावरण जाहिरनामा’, तयार करण्याची घोषणा केली.
गंगापूर रोड येथे नासिक वृक्ष संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्ष तथा पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या प्रसिद्ध म्हसोबा वटवृक्षासह मनपाने तोडण्यासाठी मृत्यूपत्र जारी केलेल्या ४९० झाडांना वाचविण्याची घोषणा केली, त्याच प्रमाणे गोदावरी व नंदिनी नद्यांच्या स्वच्छतेसाठी
काम करण्याची तळमळ व्यक्त केली, या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहर व परिसरात जेवढी झाडे अवैद्यरित्या लाकूडतोड्यांनी तथा झाडे सहन न होणार्या लोकांनी केली त्याहून कितीतरी अधिक झाडे ही नाशिक महानगरपालिकेसारख्या स्वायत्त संस्थांनी केली. बहुतांशी प्रकरणात कायद्याची पायमल्ली, पळवाटा व प्रसंगी कायद्यालाच तिलांजली देऊन, विकासाच्या नावाखाली केलेली ही वृक्षतोड नाशिककरच नव्हे तर मानवाच्या मुळावर उठली आहे.
वृक्षप्रेमी नागरिकांनी विकासाचे प्रकल्प राबविताना झाडांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या कायद्यासाठीच आग्रही आहेत, ते कायदेही आडमार्गाने गुंडाळून ठेऊन या स्वायत्त संस्थांनी पर्यावरणाचे रक्षण करून कार्बन पदचिन्हे कमी करण्याची कसुर केली आहे. येणार्या काळात नासिकची झाडे या स्वायत्त संस्थांकडूनच धोक्यात येऊ शकतात, नद्यांच्या स्वच्छतेच्या उपाययोजनांच्या नावाने शंखोबा असल्याने, पर्यावरणीय निवडणूक जाहीर नामा तयार करण्याची कल्पना पुढे आली. आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यातल्या बहुतांशी मंडळींनी आजवर झाडांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे आढळून येत नाही. बर्याच लोकनियुक्त प्रतिनिधींना तर बांधकामातुन मिळणार्या टक्केवारीत रस असतो, तर काहींचे झाडे तोडणार्यांना पाठबळ असते, त्यामुळे या कामांचा दर्जा निकृष्ट होऊन सुमार दर्जाचे रस्ते व विकास प्रकल्पच आजवर आपल्या माथी मारण्यात आले आहेत. जे मोठे प्रकल्प साकारले त्या रस्ते व उडाणपुलाने शहरवासियांची हक्काची जागा महामार्ग विकसीत करताना गिळंकृत केली व अतिशय अडचणीच्या सर्व्हिस रोड रूपी चक्रव्ह्यूवात नासिकची जनता रोजच अडचणींचा सामना करत आहेत. अनेक अपघात घडल्याचे प्रकार नासिकच्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या सदोष बांधकामामुळे झाले आणि बदल्यात नासिककरांना पन्नास ते पाचशे वर्षे जुन्या शेकडो झाडांचा बळी दिला जाताना याचीदेही याची डोळा पहावे लागले.
जुनी व मोठी झाडे तोडताना प्रशासनाने दिली आर्श्वसाने पाळली असे अगदी अपवादात्मक प्रकरणात घडले. यात लोकप्रतिनिधींनी बघ्याचीच भूमिका घेतली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारा वातावरण बदल आणि सातत्याने ढासळले जाणारे पर्यावरण, जागतिक तापमानवाढ व त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यावर येत असलेले वाईट प्रभाव जे की भविष्यात वाढत जाऊन अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण करणार आहेत व पुढील पिढीस एकवेळचे जेवणही मिळेल की नाही अशा या अती गंभीर विषयावर जाहिरनाम्याच्या रूपाने हा लढा काळाची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक झाड मोफत देत असलेला प्राणवायू तथा असंख्य पक्षी व लहान प्राण्यांचा निवारी असलेली झाडे वाचविण्यावाचून तरणोपाय उरलेला नाही, या साठी नासिककरांचा पर्यावरणीय जाहीरनामा तयार केला जाणार आहे. जे पक्ष किंवा उमेदवार या जाहीरनाम्याला पाठींबा देतील, पर्यावरणाची कोणतीच हानी होणार नाही, अशी शपथ घेतील अशांनाच मते मिळतील अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. म्हसोबा वटवृक्षासह ४९० झाडे वाचविणच्या चळवळीच्या निमित्ताने नासिक वृक्षसंवर्धन समितीला तब्बल २०,००० नागरिकांनी आपला पाठींबा दर्शविला होता. येणार्या काळात वृक्ष संवर्धन व नदी स्वच्छतेच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण प्रेमी जनता या चळवळीशी जोडली जाणार आहे. नासिक शहरा प्रमाणेच ग्रामीण भागातल पर्यावरणाच्या रक्षणासाठी निवडणूकीय जाहीर नाम्याचा वापर केला जाणार आहे.
हेतू हाच की, ”नासिकच्या पर्यावरणाचे कसोशिने संवर्धन व्हावे, विकास म्हणजे केवळ, पुल, रस्ते, बाजारपेठा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन नव्हे विकास म्हणजे आपल्याकडच्या नैसर्गिक संसाधनांची प्राणपणाने केली जाणारी जपणूक”, या तत्वावर नासिक वृक्षसंवर्धन
समिती कार्यरत राहणार आहे. या बैठकीस ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते रमेश अय्यर, राजेश पंडित, अंबरीश मोरे, मनिष बाविस्कर, मनोज साठे, चंदू पाटील, सागर शेलार, तुषार गायकवाड, डॉ. संदीप आहिरे, कैलास ठाकरे, भक्ती कोठावळे, प्रशांत परदेशी उपस्थित होते. विविध संस्थां तसेच ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांवरून आगामी आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली.