नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागांतर्गत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त्तीवेतन धारकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी जुलै महिन्याचे निवृत्तीवेतन अदा करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातल्या १५ तालुक्यातील ४११४ सेवानिवृत्तीवेतन धारकांना १६ कोटी रुपये इतक्या रकमेचे निवृत्तीवेतन जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे अदा करण्यात आले.
सेवानिवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन वेळत करण्यासंदर्भात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मागील महिन्यात बैठक घेतली होती त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील निवृत्तीवेतन हे वेळेवर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागास सेवा निवृत्ती वेतन वेळेत देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शिक्षक संवर्ग वगळता सर्व १५ तालुक्यातील ४११४ सेवा निवृत्तीवेतन धारकांचे वेतन १ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
२६ जुलै रोजी शासनाकडून सेवानिवृत्तीवेतन अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले, २७ तारखेला सामान्य प्रशासन विभागाकडून वित्त विभागास देयक मान्यतेने देयक जिल्हा कोषागारात सदर करण्यात आले. जिल्हा कोषागारातून २८ रोजी निधी हा वर्ग करण्यात आला. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून वित्तप्रेषणद्वारे वित्त विभागाकडून १५ तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी सर्व देयके तपासून ३१ जुलै रोजीच जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे अदा केले. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी सर्व सेवानिवृत्ती वेतन धारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन हे जमा झाले.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कनिष्ठ सहायक ललिता मोंढे, कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे यांनी शनिवार व रविवार शासकीय सुटीच्या दिवशी देखील कामकाज करून देयके ही वित्त विभागात सादर केली वित्त विभागात वरिष्ठ सहायक लेखा रामेश्वर बादड, सहायक लेखाधिकारी पूनम भांबरे, लेखाधिकारी रमेश जोंधळे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनी तातडीने देयके ही जिल्हा कोषागारात सदर केली जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी निधी वितरीत केला.
प्रत्येक महिन्यात अशाच पद्धतीने कार्यवाही
जिल्हा परिषदेतील ४११४ सेवा निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्तीवेतन हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात करण्याचे निर्देश दिले असता समान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, जिल्हा कोषागार व सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी तत्परतेने कार्यवाही करत १ तारखेला निवृत्तीवेतन हे सेवा निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यावर जमा करण्यात आले, निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात अशाच पद्धतीने कार्यवाही करत प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.
– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक
nashik zp pension retired servants bank ashima mittal ceo jilha parishad district rural employee