नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी ८ जून २०२३ रोजी संबंधित सर्व ग्रामसेवक यांची सुनावणी घेवून व त्यांचे म्हणणे ऐकून घेवुन त्यानुसार एकुण ११ ग्रामसेवक यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. त्यात २ ग्रामसेवक यांना त्यांचे म्हणणे मान्य करुन त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे. तसेच ३ ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फे व सेवा समाप्त करण्यात आलेल्या कारवाईत हेमराज गावित, सतिष बुधाजी मोरे बडतर्फ, अतिष शेवाळे ही नावे आहे.
हे तीन ग्रामसेवक बडतर्फ
हेमराज गावित हे निळगव्हाण, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना सन २०१८ पासुन गैरहजर असणे, सतिष बुधाजी मोरे, हे कौळाणे, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना मासिक व पाक्षिक सभांना सतत गैरहजर असणे, ग्रामपंचायत कार्यालयाचा आढावा न देणे, मुख्यालयी हजर न राहणे, व कार्यालयाचे आदेशाचे पालन न करणे या कारणांमुळे आणि अतिष अभिमन शेवाळे हे कंत्राटी ग्रामसेवक सन २०२० पासून कंत्राटी ग्रामसेवक ग्रामपंचायत बोराळे येथे कार्यरत असून दि. ०९.०५.२०२३ रोजी रु. १५०००/- लाचेची मागणी करुन ती स्विकारल्याप्रकरणी त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार दि.०९.०५.२०२३ रोजी वडनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे.
आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई
तसेच निलेशसिंग गोविंदसिंग चव्हाण हे वासाळी, ता. इगतपुरी येथे कार्यरत असतांना रेखांकित धनादेशाद्वारे रक्कम खर्च न करता रु.२४,४५,४५०/- दर्शनी धनादेशाद्वारे खर्च करणे व इतर आरोपांमुळे त्यांना मुळ वेतनावर आणणे, सुभाष हरी गायकवाड हे टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असतांना सन २००० या वर्षातील मृत्युची नोंद २१ वर्षानंतर नियमबाह्यपणे व अधिकार नसतांना करणे, यामुळे त्यांना मुळ वेतनावर आणणे, जयदिप उत्तम ठाकरे हे ग्रामपंचायत दुगांव, ता. चांदवड येथे कार्यरत असुन सन २०१५-१६ येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ६ वर्षे नंतरही उपलब्ध करुन न देणे, यामुळे त्यांच्या ३ वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करणे, परशराम रायाजी फडवळ हे चिचोंडी, ता. येवला येथे कार्यरत असताना दप्तर उपलब्ध करून न देणे, कार्यभार हस्तांतर न करणे, चिचोंडी बु. येथील १४ वा वित्त आयोगाची रक्कम रु. ९८००० पिंपळगांव लेप या ग्रामपंचायतीकडे वर्ग न करणे या कारणामुळे व सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या निवृत्तीवेतनातून १० टक्के रक्कम ३ वर्षासाठी कपात करणे, शशिकांत जावजी बेडसे हे वडगांव पंगु, ता. सिन्नर येथे कार्यरत असतांना ग्रामपंचायत नमुना नं. ०१ ते ३३ अद्यावत न करणे व पीएफएमएस प्रणालीवर डीजीटल सिग्नेचर इंटीग्रेट न करणे, म्हणून त्यांच्या ३ वार्षिक वेतनवाढी कायमस्वरुपी बंद करणे, माधव बुधाजी सुर्यवंशी हे कुरुंगवाडी, ता. इगतपुरी येथे कार्यरत असतांना मानव विकास कार्यक्रम यात रु. ४,०१,००० नियमबाहय खर्च करुन पुन्हा ग्रामसभा कोष खात्यावर भरणे म्हणून त्यांना समयश्रेणीतील निम्नस्तरावर आणणे, देवेंद्र सुदामराव सोनवणे हे पळासदरे, ता. मालेगांव येथे कार्यरत असतांना दि. १६.०६.२०१९ ते १५.०९.२०२० या कालावधीत अनधिकृत गैरहजर असणे म्हणुन त्यांच्या ३ वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करणे, नरेंद्र सखाराम शिरसाठ हे ग्रामपंचायत म्हाळसाकोरे, ता. निफाड येथे कार्यरत असतांना स्वतःच्या नावाने धनादेश काढणे व दरपत्रका अभावी साहित्य खरेदी करणे म्हणुन त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करणे, अशी शिक्षा देण्यात आलेली आहे. तसेच विजय गोपाळ अहिरे हे टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असतांना त्यांचेविरुध्द दोषारोप सिध्द झाले आहेत, तथापि, त्यांचा खुलासा मान्य करून त्यांना शिक्षा न करता त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे आणि उल्हास बसवराज कोळी हे वरसविहिर, ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असतांना त्यांच्याविरुध्दचे दोषारोपास त्यांनी दिलेला खुलासा मान्य करुन त्यांनी विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे.
तसेच अमोल गोविंद धात्रक हे मळेगांव, ता. नांदगांव येथे कार्यरत असतांना रु. ४,९७,००० ची प्रमाणके लेखापरीक्षणास उपलब्ध करून न देणे याबाबत गट विकास अधिकारी, नांदगाव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. सुरेश छगन पवार हे उम्रद, ता. पेठ येथे कार्यरत असतांना त्यांनी एकूण रु. ६३,४५,०८४ रकमेची प्रमाणके, अंदाजपत्रके न देणे, याबाबत गट विकास अधिकारी, पेठ तसेच शाखा अभियंता व विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीस भेट देवुन उपरोक्त सर्व कामांची व कागदपत्रांची पहाणी करुन मुद्येनिहाय स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे आणि श्री. ज्ञानोबा बाबुराव रणेर हे ग्रामपंचायत सोनारी शिवडे ता. सिन्नर येथे कार्यरत असतांना सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांची दप्तर तपासणी गट विकास अधिकारी, सिन्नर यांना करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
यानुसार माहे जून २०२३ या महिन्यात विभागीय चौकशीच्या एकुण १६ प्रकरणांवर कार्यवाही करून त्यात ११ ग्रामसेवक यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आली असून त्यात २ ग्रामसेवक यांना दोषमुक्त करण्यात आले आहे व ३ ग्रामसेवक यांच्या कामकाजाबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
किमान शिक्षेबाबत निर्णय घेण्यात आला
नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक हे केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध विकास योजना यांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करत आहेत आणि नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत. तथापि काही ग्रामसेवक यांना वेळोवेळी संधी देऊनही त्यांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारण न झाल्याने व अंतिमतः विभागीय चौकशीत त्यांच्याविरुद्धचे दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांना नैसर्गिक न्यायतत्वानुसार त्यांच्या खुलासा सादर करण्याची सुनावणीत संधी देण्यात आली आहे व त्यानुसार त्यांच्याबाबत किमान शिक्षेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरी संबंधित सर्व ग्रामसेवक यांनी यापुढे शासन नियमानुसार कामकाज करावे.
आशिमा मित्तल, सीईओ, नाशिक जि.प.