संदीप दुनबळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
माजी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शिंदे गट शिरकाव करण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. सध्या भुजबळ आणि दराडे या दोघांपासूनही दोन हात अंतर राखून असलेले माणिक शिंदे यांची भूमिका आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महत्वाची राहणार असल्याचे मानले जाते असून त्यांना शिंदे गटात आणण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास भुजबळ यांच्या येवल्यात प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
भुजबळ यांनी नाशिक मधून नशीब जमविण्याचा निर्णय घेतल्यानंतर येवला विधानसभा मतदारसंघाची निवड केली. किंबहुना भुजबळ यांना येवल्यात आणण्यासाठी ज्यांनी कोणी पुढाकार घेतला, त्यात शिंदे अग्रभागी होते. कालांतराने हेच शिंदे भुजबळ यांच्यापासून दुरावले. विद्यमान आमदार नरेंद्र दराडे हेही भुजबळ यांना सोडून गेले. राजकीय महत्वाकांक्षा त्यास कारणीभूत ठरली. भुजबळ यांनी सत्तेच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले. त्यामुळे साहजिकच येवल्याचाही वरचष्मा राहिला. पण, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला मर्चंट बँक, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी संस्थांमध्ये आपले वर्चस्व दाखविण्यासाठी भुजबळ अन त्यांच्यापासून दुरावलेले, असाच सामना येवलेकरांनी पहिला.
या तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट असून यापैकी तीन गट शिवसेनेच्या ताब्यात असून राष्ट्रवादीकडे दोन गट आहे. पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व त्यातल्या त्यात स्वतःचीच राजकीय सोय पहिली गेली असल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या बाबतीत ही बाब लागू होते. सविता पवार ह्या शिवसेनेच्या असून त्या संभाजी पवार यांच्या भावजयी आहेत. संभाजी पवार यांनी भुजबळ यांच्या विरोधात विधान सभेची निवडणूकही लढवली आहे. सुरेखा दराडे ह्या विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांच्या सौभाग्यवती आहेत. कमल आहेर याही शिवसेनेच्याच आहेत. संजय बनकर आणि महेंद्र काले हे दोघेही भुजबळ समर्थक मानले जातात. जे कोणी मागच्या पंचवार्षिक मध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिरवले त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांऐवजी स्वतःच्याच पदरी लाभ पाडून घेतला हे लपून राहिले नाही. आतापर्यंत या तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच खरा सामना रंगलेला दिसून आला. भाजपाला एक ही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आलेला नाही.
तर शिंदे गटात प्रवेश
माणिक शिंदे सध्या सगळ्याच राजकीय पक्षांपासून दोन हात दूर आहेत. भुजबळ यांच्यापासून दुरावलेले शिंदे मध्यंतरी दराडे यांच्याकडे झुकले होते. सध्या त्यांपासून ते अंतर ठेवून आहेत. शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेकडे जाण्याची तयारी करीत आहेत. किंबहुना त्यांना या शिवसेनेत आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शिंदे यांचे बळ ज्या पक्षाला मिळेल तो पक्ष बाजी मारेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माणिक शिंदे महत्वाच्या भूमिकेत राहणार आहेत. शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेले किशोर दराडे हे मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही कार्यक्रमांमध्ये दिसून आले होते. त्यामुळे माणिक शिंदे यांना त्यांचीही साथ मिळू शकते आणि येवल्यात शिंदे गटाचा प्रवेश होऊ शकतो.
नवीन चेहरे
आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे संपूर्ण तालुक्यात सक्रिय झाले आहेत. सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ते मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधान सभा असो किंवा जिल्हा परिषद असा कोणताही आखाडा गाजविण्याचा तयारीत आहेत. जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळाली तर राजापूर गटातून ते लढू शकतात. हे सारे आरक्षणावर अवलंबून आहे. भुजबळ यांचे स्वीय सहायक महेश पैठणकर यांचे बंधू सुनील पैठणकर कट्टर भुजबळ समर्थक मानले जात असून तेही जिल्हा परिषदेची तयारी करीत आहेत. तसेच कधी काळी भुजबळ यांच्या जवळ असलेले पण सध्या शिवसेनेत असलेले प्रवीण गायकवाड हेही गट मिळाल्यास पुन्हा रिंगणात उतरू शकतात
गेल्या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य
संजय बनकर – पाटोदा गट (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेखा दराडे -राजापूर गट (शिवसेना), महेंद्र काले -अंदरसूल गट (राष्ट्रवादी काँग्रेस), सविता पवार- नगरसूल गट (शिवसेना) , कमल आहेर – मुखेड गट (शिवसेना)
Nashik ZP Election Yeola Taluka Politics