संदीप दुनबळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर आता त्याचे थेट परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही दिसून येत आहेत. शिंदे गट अस्तित्वात आल्यानंतर आगामी जिल्हा परिषद-पंचायत समित्या आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी आजी-माजी आमदारांबरोबरच आमदार होण्याची इच्छा बाळगून असलेल्यांमध्येही जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. निफाड तालुक्यात हा सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट दहा गट एकट्या निफाड तालुक्यात आहे. एवढेच नाही तर या तालुक्यात राजकीय घमासानही नेहमीच पाहायला मिळते. आतापर्यंत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातच चढाओढ पाहायला मिळाली आहे. कधी कदम तर कधी बनकर हेच आलटूनपालटून तालुक्याचे नेतृत्व करीत असल्याचे लपून राहिले नाही. केवळ विधानसभेत नाही तर तालुक्यातील छोटामोठ्या संस्थाही आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी हे दोघे नेहमीच प्रयत्नशीलही असतात. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपलीच सत्ता आणण्यासाठी कदम-बनकर यांच्यातील संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे. शिवसेनेतून चाळीस आमदारांना घेऊन सावता सुभा मांडणारा एकनाथ शिंदे यांचा गट अस्तित्वात आल्यानंतर सारीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक राजकारणावरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
चांदोरी, सायखेडा, उगाव, पालखेड, ओझर यासारख्या गटामंध्ये शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. पण अंतर्गत राजकारणामुळे सायखेडा, चांदोरी, पालखेड हे गट गेल्या वेळी कदम यांच्या हातून निसटले. याठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. यावेळी कदम हे अद्याप उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठी अधिकाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर दुसरीकडे बनकर हेही जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ताकत लावतील, असेही मानले जात आहे. अर्थात ही सध्याची राजकीय परिस्थिती पाहून बांधलेला अंदाज आहे. पण ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल. कारण दोघंही नेत्यांना कडवी झुंज देण्याऐवजी गळ्यात गळा घालून रिंगणात उतरावे लागणार आहे.
यतीन कदम यांची एण्ट्री
दिवंगत माजी आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम हेही निवडणुकीत रंग भरण्याच्या तयारीत आहे. यतीन यांनी जिल्हा परिषद सदस्यपद भूषविले असून थेट ग्राउंड वर जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे बऱ्यापैकी जनाधार त्यांनी मिळविला आहे. सध्या ते भाजपमध्ये असून आपल्या पक्षाची ताकत वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते सर्वस्व पणाला लावू शकतात. कारण त्यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची आहे. म्हणजे राज्यात कितीही राजकीय घडामोडी घडल्या तरी निफाड तालुक्याचे राजकारण दोन कदम आणि एक बनकर यांच्यातच रंगण्याची दाट शक्यता आहे.
भाजपचा विस्तार
यतीन कदम यांनी निफाडच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपली ताकत वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या वेळी ते अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. एवढेच नाही तर स्थानिक आघाडीच्या पाठींब्यावर विधानसभेची निवडणूकही लढली होती. पंचवीस हजारापेक्षा अधिक मते घेत अनिल कदम याच्या पराभवास हातभारही लावला होता. हेच यतीन कदम आता भाजपात असून त्यांना विस्तारण्यासाठी पक्षाचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे या तालुक्याचे राजकारण पुढील काळात चांगलेच रंगणार आहे. वर्षानुवर्षे तेच कदम अन तेच बनकर बघून वैतागलेल्या मतदारांना आता यतीन कदम यांच्या रूपाने नवा पर्याय मिळू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक यतीन यांच्यासाठीही महत्वाची मानली जात आहे
गेल्यावेळी कोणच्या ताब्यात किती गट
राष्ट्रवादी काँग्रेस -५ शिवसेना -३ भाजप-१ अपक्ष -१
Nashik ZP Election Niphad Bankar Kadam Politics