नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट असून गेल्यावेळी यापैकी तीन गट राष्ट्रवादीच्या ताब्यात होते तर एका गटात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. विधानसभेच्या नाशिकरोड-देवळाली मतदारसंघावर वर्षानुवर्षे राज्य करणारे शिवसेनेचे माजी आमदार बबन घोलप असो की याच पक्षाचे खासदार अन सध्या शिंदे गटात सामील झालेले हेमंत गोडसे यांना मात्र याठिकाणी अपयशाचा धक्का पचवावा लागला हे विशेष! शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अन् आणखी एक पदाधिकारी या गटात असल्याने आगामी निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.
नाशिक तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही ताकद आहे. भाजप, काँग्रेस यासारख्या पक्षांना या तालुक्यात जनतेने जवळ केले नसल्याचे दिसून येते. नाशिकरोड -देवळाली या विधानसभा मतदार संघ असून या ठिकाणी घोलप यांनी अनेक वर्ष निवडून येण्याची किमया साधली. त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रानेही आमदारकी भूषवली. म्हणजे शिवसेनेचा भगवा अनेक वर्ष या मतदारसंघात फडकत होता. त्याचे श्रेय अर्थातच घोलप यांचे! गेल्या वेळी मात्र राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी हा मतदारसंघ घोलप यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला. घोलप पिता -पुत्राला साथ देणाऱ्या या मतदारसंघाने घोलप कन्येला मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाकारल्याचाही इतिहास आहे. केवळ घोलपच नाही तर खासदार गोडसे यांच्या पुत्रालाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. स्वतः खासदार असताना पुत्रालाही जिल्हा परिषद सदस्य करण्याच्या नादात गोडसे यांनी आपल्याच पक्षांतर्गत नाराजी ओढवून घेतली. आणि याच पक्षाचे शंकरराव धनवटे यांनी गोडसे पुत्रविरोधात अपक्ष निवडणूक लढवीत निवडून येण्याचा इतिहास घडविला होता. म्हणजे शिवसेनेकडूनच शिवसेनेचा पराभव झाला होता. खरे तर गोडसे असो की घोलप यांच्याबाबतीत जे घडले त्यास पक्षांतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचे जाणकार सांगतात.
गिरणारे, पळसे, एकलहरा, गोवर्धन असे चार गट या तालुक्यात आहेत. एकलहरा वगळता अन्य तिन्ही गटांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. गिरणारे अन गोवर्धन गटात सध्या आमदार असलेले हिरामण खोसकर आणि त्यांच्या सुनबाई अपर्णा ह्या निवडून आल्या होत्या. या दोन्ही गटांवर राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचे वर्चस्व आहे. कारण, त्यांचे मोठ्या प्रमाणावर समर्थक याठिकाणी आहेत. वर्षानुवर्षे या दोन्ही गटांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. पुढील काळात मात्र या चारही गटांची समीकरणे बदलणार काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती अनिल ढिकले शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांच्या जोडीला शिवाजी भोर हे देखील शिंदे गटात आहेत. ढिकले हे जिल्हाप्रमुख झाले असून भोर यांनाही पद बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या दोघांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. शिंदे गटाचा जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी संबंधितांना ताकद लावावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना विशेषतः ढिकले यांना स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा गुंडाळून ठेवावी लागणार आहे. असे ते करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. दुसरीकडे संबंधितांना पद असले तरी मागे कार्यकर्ते किती हेही महत्वाचे आहे. कारण निवडणुकीत प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फळी लागते ती सध्य़ा ढिकले -भोरच काय अख्ख्या शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हानच संबंधितांसमोर आहे.
या चारही गटांमध्ये राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या नेहमीच जास्त असते. उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढही असते. उमेदवारी न मिळाल्याने युवक राष्ट्रवादीच्या दीपक वाघ यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा रोष पक्षाला सहन करावा लागला आहे. बरेचसे कार्यकर्ते संधी मिळत नसल्याने पक्षापासून दुरावले आहेत. आगामी निवडणुकीत अशा नाराजांची नाराजी दूर करण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेलाही शिंदे गटाचे आव्हान पेलावे लागणार आहे. कारण उमेदवारी न मिळाल्यास शिंदे गटाचा पर्याय नाराजांसमोर खुला राहणार आहे.
गेल्या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य
*गिरणारे – अपर्णा खोसकर (राष्ट्रवादी)
*पळसे -यशवंत ढिकले (राष्ट्रवादी)
*गोवर्धन -हिरामण खोसकर (राष्ट्रवादी)
* एकलहरे- शंकरराव धनवटे (अपक्ष)
Nashik ZP Election Nashik Taluka Politics
Rural Area NCP Shivsena Congress BJP