चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. याची दखल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिमा मित्तल यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी तालुक्यातील वडबारे ग्रामपंचायत नजिकच्या रस्त्याच्या कामाची आज पाहाणी केली. यावेळी त्यांनी रस्ता कामाचा दर्जा बघण्यासाठी थेट रस्ता खोदायला लावला. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता कामाच्या दर्जाबद्दल अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणा-या अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे नवीन रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबतही अनेक तक्रारी आहे. निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याच्या नागरिकांच्या याअगोदर अनेक तक्रारी होत्या. पण, त्याची दखल कधीच घेतली नाही. आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल स्वत. रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेल्या. आता या पाहणीनंतर अधिकारी अहवाल काय देतात. त्यानंतर त्यावर काय कारवाई होते. हे पुढील काळात कळणार आहे.
दरम्यान, सीईओ मित्तल यांच्या या धडक कारवाईमुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. चांदवड पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील अन्य रस्त्यांच्या गुणवत्तेचीही पोलखोल होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना यानिमित्ताने चांगलाच इशारा मित्तल यांनी दिला आहे.
Nashik ZP CEO Rural Roads Quality Checking
Ashima Mittal Chandwad