नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) ओमकार पवार यांनी आज मध्यानपूर्व पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. ओमकार पवार हे यापूर्वी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
राज्य सरकारकडून नुकतेच त्यांच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. सदर आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, लोकाभिमुख प्रशासन म्हणून पुढील काळात जिल्हा परिषदेच्या वतीने काम करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.