नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे. नजिकच्या काळात होणाऱ्या या निवडणुकीत दोन्हींच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे इच्छुकांना नामी संधी मिळणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव जागांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या ७३ तर १५ पंचायत समितीच्या मिळून एकूण १४६ जागा आहेत. यापूर्वीची निवडणूक ही २०१७ मध्ये झाली होती. आता येत्या काही महिन्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. २०११ मध्ये झालेली जनगणना आणि गेल्या वर्षी म्हणजे २०२१मध्ये नियोजित असलेली जनगणना या सर्वांचा विचार करता वाढीव लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या जागा वाढविल्या जाणार आहेत.
नव्या प्रस्तावानुसार जिल्हा परिषदेच्या तब्बल ११ जागा जिल्ह्यात वाढणार आहेत. म्हणजेच जिल्हा परिषदेतील एकूण सदस्यांची संख्या थेट ८४ होणार आहे. नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत. त्यामुळे १५ पंचायत समित्या कार्यरत आहेत. त्यात आता तब्बल २२ जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांची एकूण संख्या आता १४६ वरुन १६८ होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या केवळ १० तालुक्यांमध्येच वाढणार आहे. त्यानुसार, मालेगाव तालुक्यात २ तर सटाणा, कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ जागा वाढणार आहे. साधारण २० ते ३० हजार लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व एक जिल्हा परिषद सदस्य करेल, असे नियोजन आहे. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता येताच या नव्या संख्येनुसार, निवडणुका होणार आहेत.