नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्हा परिषद नाशिकला ३३ आसन व्यवस्था असलेल्या प्रवासी बसचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य महाप्रबंधक अरविन्दकुमार सिंह यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना हस्तांतरण करण्यात आले. यावेळी उपमहाप्रबंधक (एसएमई) कुमार परिमल, नाशिकचे उपमहाप्रबंधक नीरजकुमार साह, क्षेत्रीय प्रबंधक सत्यप्रकाश झा, क्षेत्रीय प्रबंधक (ग्रामीण)पूर्वेन्द्रकांत मिश्रा, जिल्हा कोषागार शाखेचे व्यवस्थापक समीर जोशी, मयंक चतुरवेदी, यज्ञेश झवर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग याबरोबरच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या उपक्रम, योजना यांना भेटी देऊन या क्षेत्र भेटीतून यंत्रणेला नवीन संकल्पना मिळतात. यातून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागाचा अधिक विकास करण्यासाठी मदत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत. हे उपक्रम राबवत असतांना ज्या उपक्रमांना शासनाचा निधी उपलब्ध होत नाही अशा उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सीएसआर निधीचा उपयोग घेतला जातोय. यानुषंगाने श्रीमती मित्तल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रीय भेटी देणे करिता लहान बसची मागणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे केली होती.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हा कोषागार शाखेचे व्यवस्थापक समीर जोशींनी याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे सादर केला त्यांनी लगेचच हा प्रस्ताव मान्य करत फोर्स कंपनीची ३३ आसन व्यवस्थेची बस प्रादेशिक परिवहन कार्यालयातून नोंदणी करून सर्व सोपस्कार पूर्ण करत आज रोजी जिल्हा परिषदेस हस्तांतरित केली. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भविष्यात जिल्हा परिषदेकडून विविध अभ्यास दौऱ्यासाठी या बसची मदत होणार असल्याचे नमूद करत स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक यांचे आभार मानले.