नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेटी दिल्या व कार्यालयीन स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या टेबलवरील आणि संपूर्ण विभागातील स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या व कार्यालयातील संपूर्ण अभिलेख वर्गीकरण करून आठ दिवसांच्या आत त्यांना योग्य प्रकारे अभिलेख कक्षात जमा करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिलेख वर्गीकरणाचे प्रशिक्षण देण्याचे तात्काळ निर्देश दिले व त्यानुसार लगेचच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या(अभिलेखांचे वर्गीकरण, परिक्षण व नाशन) नियम १९६४, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५, शासन निर्णय दि.३० ऑक्टोबर २०१७ यासंदर्भात प्रशिक्षण दिले. यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अभिलेखाचे अ, ब, क, ड वर्गीकरण तसेच ६ गट्ठे पद्धत याअंतर्गत प्रलंबित प्रकरणे, प्रतिवीक्षाधीन प्रकरणे, नियतकालिके, स्थायी आदेश संचिका, अभिलेख कक्षात पाठविण्यात येणारी प्रकरणे, नाश करावयाची कागदपत्रे याबद्दल प्रशिक्षण दिले. जिल्हा परिषद मुख्यालयातील १८ विभागांमध्ये कार्यरत ४०० अधिकारी व कर्मचारी यांचे ६-६ विभागांच्या गटाने अभिलेख वर्गीकरणाबाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले.
मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत शासन निर्णय १३ जानेवारी २०२५ नुसार शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून ७ कलमी कार्यक्रम राबावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये कार्यालयीन स्वच्छतेवर भर देण्यात आला असून याअंतर्गत विभागांचे अभिलेख वर्गीकरण करण्याचे देखील सूचना आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अभिलेख अधिकारी म्हणून संबंधित विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अथवा कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना अभिलेख कक्षाची पाहणी करून कार्यालयातील कामकाज पूर्ण झालेल्या सर्व संचिका अभिलेख कक्षामध्ये पाठवण्याबाबत निर्देश देण्यात आले.याबाबत सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र येवला, अनिल दराडे, विस्तार अधिकारी सांख्यिकी सचिन बच्छाव, वरिष्ठ सहायक सुनील थैल यांनी सहाय्य केले.