नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने जिल्हा परिषद नाशिकने अभिनव पाऊल टाकले आहे, लोकसेवा हक्कांतर्गत मिळणाऱ्या विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता शासकीय कार्यालय गाठण्याची आवश्यकता नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “जनसेतू” हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावरून तब्बल २२ सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
या सेवांमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या ७, महिला व बालकल्याण विभागाच्या ३ तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या १२ अशा एकूण २२ महत्त्वपूर्ण सेवांचा समावेश आहे. या सुविधा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये वापरता येतील, ही देखील महत्त्वाची बाब आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये :
ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण व शिक्षण विभागांच्या महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी
मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये वापरण्याची सोय
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाविषयी तक्रार थेट संबंधित विभागप्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा
अशा आहेत दिल्या जाणाऱ्या सेवा –
ग्रामपंचायत विभागाच्या सेवा :
जन्म, मृत्यू व विवाह नोंद दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायतीचे येणे बाकी नसल्याचा दाखला
नमुना क्र. ८ चा उतारा
निराधार असल्याचा दाखला
महिला व बाल विकास विभागाच्या सेवा :
अंगणवाडीत गरोदर महिलांची नाव नोंदणी
६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांची नाव नोंदणी
३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत नोंदणी
प्राथमिक शिक्षण विभागाच्या सेवा :
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी (महाराष्ट्राबाहेरील शिक्षणासाठी)
विद्यार्थ्याच्या जात, जन्मतारीख, नाव बदल मान्यता आदेश
खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकीय खर्च मंजुरी आदेश (२ लाख रुपयांपर्यंत)
खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मान्यता आदेश (वैयक्तिक मान्यता, वरीष्ठश्रेणी, निवडश्रेणी, पदोन्नती मान्यता)
विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर बदलीस मान्यता
सेवानिवृत्ती लाभ मंजुरी (भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण, अंशराशीकरण)
अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर समायोजन व बदली मान्यता
प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता
जिल्हा परिषद नाशिकचा अधिकृत WhatsApp क्रमांक : +91 7263061766 या क्रमांकावर Hi मेसेज करून आपण या सेवांचा लाभ घेऊ शकता.
या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक प्रवास वाचणार असून, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव त्यांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोबाईलच्या एका क्लिकवर शासकीय सेवा सहज उपलब्ध होतील, हा या उपक्रमाचा मोठा फायदा आहे.
‘जनसेतू’ हा खरा अर्थाने डिजिटल सेतू
“जनतेपर्यंत सेवा पोहोचवणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावरून २२ सेवा उपलब्ध करून देताना आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला घरबसल्या, सोप्या व पारदर्शक पद्धतीने शासनाच्या योजना व सेवांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या उपक्रमामुळे नागरिक व शासनामधील दरी कमी होऊन ‘जनसेतू’ हा खरा अर्थाने डिजिटल सेतू ठरणार आहे.”
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.