नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत आलेला प्रत्येक विद्यार्थी हा शालेय स्तरावरून जिल्ह्याच्या व्यासपीठावर आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतोय त्यामुळे येथील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने आपण काहीतरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगावे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे असे प्रतिपादन करत सर्व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुभेच्छा दिल्या.
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक २०२४-२५ चा समारोप आज स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झाला, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेते पद पटकावणाऱ्या इगतपुरी पंचायत समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
नाशिक जिल्हा परिषदेच्या दोन दिवसीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचा समारोप आज स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झाला यामध्ये सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वक्तृत्व, चित्रकला, बुद्धिबळ, गीत गायन, समूह गीत, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य व क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे (मुले/ मुली) खो-खो (मुले/मुली) कबड्डी (मुले/मुली) या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी इगतपुरी तालुक्याने आपला दबदबा निर्माण करत सर्वसाधारण जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला.
स्पर्धकांनी केला एकच जल्लोष
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी स्पेलिंग बी सोबत मॅथ बी ही स्पर्धा घेण्यात आली त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देखील विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे स्पेलिंग मॅथ बी व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या लक्षवेधी ठरल्या. स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून परीक्षकांनी प्रथम व द्वितीय क्रमांक सोबतच उत्तेजनार्थ पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धेमध्ये देण्यात यावे अशी मागणी केली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी लगेचच ही ही मागणी मान्य करत लगेचच या संदर्भात परिपत्रक काढून पुढील वर्षापासून अध्यक्ष चषक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात येतील अशी घोषणा केली यामुळे स्पर्धकांनी एकच जल्लोष केला.