नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी रविवार रोजी कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान नवी बेज येथील २ व ओतूर २ असे एकूण चार कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले. या गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या.
नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व आरोग्य सहाय्यक हे कर्मचारी कार्यस्थळी अनुपस्थित होते, तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच परिचर कार्यस्थळी अनुपस्थित असल्याचे आढळले. या घटनेची गंभीर नोंद घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा सूचना दिल्या, सदर कारणे दाखवा नोटीसबाबत जर समाधानकारक व समर्पक खुलासा प्राप्त झाला नाही, तर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत पाहाणी केली. यामध्ये आरोग्य केंद्राची स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांशी संवाद साधून माहिती घेतली, तसेच औषधांचे स्टॉक बुक व तपासणी सेवा आदी बाबींची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासंबंधीही सूचना केल्या.
कठोर कारवाई करण्यात येईल
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित जबाबदाऱ्या ही सर्वोच्च प्राधान्याने पार पाडल्या पाहिजेत, ग्रामीण भागातील रुग्णसेवा बाधित होता कामा नये याची खबरदारी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने घेणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक