नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ग्रामविकास विभागाच्या पंचायत प्रगती निर्देशांक (Panchayat Advancement Index – PAI) अंतर्गत सन २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) हा बहु-क्षेत्रीय निर्देशांक असून तो सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण प्रगतीचे गुणांकन करण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांची कामगिरी पारदर्शकतेने मोजून त्यांना विकासामध्ये कोणत्या क्षेत्रांत सुधारणा करणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी पंचायतींनी केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा ३ स्तरांवर या निर्देशांकाचे मूल्यांकन केले जाते. या यादीत नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे, तर राज्यातील प्रथम दहा पंचायत समित्यांमध्ये नाशिक पंचायत समितीने पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर चांदवड पंचायत समितीने उल्लेखनीय कामगिरी करत ९वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षम नियोजन, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून झालेली प्रगती आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या स्तरावरही नाशिक जिल्ह्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ठ ग्रामपंचायतींच्या यादीत नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीने ५वा क्रमांक तर इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने ६वा क्रमांक पटकावून नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. ही यशस्वी कामगिरी ग्रामपंचायतींनी सातत्याने विकासाभिमुख उपक्रम राबवले, नागरिकांच्या गरजांनुसार योजना आमलात आणल्या आणि पारदर्शक प्रशासन दिले याचे फलित आहे. दि. २६ रोजी होणाऱ्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या पुणे येथील कार्यशाळेत राज्याचे मा. ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, ,मा. प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा गौरव होणार आहे.