नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या पोषण दूत उपक्रमांतर्गत अंतर्गत कुपोषण निर्मूलनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (भा.प्र.से.) यांनी स्वतः ‘पोषण दूत’ बनत दीपक गोरख पिंपळके या वैष्णवनगर येथील कुपोषित बालकाचे आरोग्य सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दीपक हा केवळ पाच वर्षांचा असून त्याचे वजन ११ किलो व उंची ९३ सेमी नोंदविण्यात आली आहे. त्याला सॅम श्रेणीतील (अति तीव्र कुपोषित) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा बालकांचे योग्य आहार, वैद्यकीय सल्ला व कुटुंबास मार्गदर्शन करून आरोग्य सुधारले जाऊ शकते, यासाठी ‘पोषण दूत’ म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी थेट कुटुंबाशी संपर्क साधणार आहेत.
या प्रसंगी बोलताना पवार म्हणाले, कुपोषण निर्मूलन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. एक अधिकारी एक बालक अशा पद्धतीने आपण पुढाकार घेतला तर नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त करण्यास मदत होईल.
पोषण दूत उपक्रमांतर्गत प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील एका कुपोषित बालकाला दत्तक घेतो. संबंधित बालकाच्या कुटुंबाशी नियमित संवाद साधून आहारपद्धती, स्वच्छता, आरोग्य तपासण्या व पूरक आहार याबाबत लक्ष ठेवले जाणार आहे व अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविका यांच्याशी समन्वय साधून बालकाचे नियमित वजन व उंची तपासली जाईल, यामुळे कुपोषित बालकांच्या प्रगतीवर थेट लक्ष ठेवले जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुख, प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी यांनी देखील कुपोषित बालकांचे ‘पोषण दूत’ बनावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कुपोषित बालकाच्या आरोग्याची सामूहिक जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे, यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, सरपंच मंगळु पिंपळके, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ तरवारे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.