नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषद नाशिकतर्फे गट ‘क’ भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उमेदवारांचा सन्मान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत दि. १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.
सन 2023 च्या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद नाशिकच्या विविध विभागांमध्ये गट ‘क’ श्रेणीतील विविध पदांसाठी नियुक्ती देण्यात आल्या. प्राथमिक निवड यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. शासनाच्या नियमांनुसार, रिक्त जागा उपलब्ध झाल्यास या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्याने संधी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, आता उपलब्ध झालेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कनिष्ठ सहायक (लिपिक) ५, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) १, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १, ग्रामपंचायत अधिकारी २, आरोग्य सेवक (५०%) २७ आणि आरोग्य सेवक (४०%) ९ व अशा एकूण ४५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याने, जिल्हा परिषद भरतीतील प्रतीक्षा यादी मधील उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरणही या दिवशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतला आहे. जिल्हा परिषद नाशिकने यापूर्वीही भरती प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेत पूर्णता आणि पात्र उमेदवारांना संधी देण्याच्या बाबतीत आपला ठसा उमटवला आहे.