नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती देण्यात आली असून, मंगळवार दि. २३ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना करण्यात आली, समुपदेशनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नती आदेश निर्गमित आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) डॉ. सानिया नाकोडे, शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, सहायक प्रशासन अधिकारी महेंद्र पवार यांच्यासह कनिष्ठ प्रशासन अधिकारी अर्जुन निकम, वरिष्ठ सहाय्यक हर्षा पजई, किशोर पवार, सलीम पटेल, अरुण भदाणे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समुपदेशनाने पारदर्शकरित्या सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पदोन्नती झालेल्या सर्व विस्तार अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन मन:पूर्वक आभार मानले.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे
जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाने आपल्या कार्यक्षमतेने शिक्षण व्यवस्थापनात व नाविन्यपूर्ण उपक्रमात मोलाचे योगदान दिले आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) पदावर पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी नव्या भूमिकेतून ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक