नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने राबविण्यात आलेल्या “सुपर ५०” उपक्रमाला अपेक्षित यश प्राप्त झाले असून, या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतुन सुपर 50 उपक्रमास सुरवात करण्यात आली. उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना IIT, IIIT आणि अन्य नामांकित अभियांत्रिकी संस्थामध्ये प्रवेश मिळावा यासाठी निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात आले. सन 2023 व सन 2024 च्या बॅच मधील 6 विद्यार्थ्यांची निवड आता आयआयटीमध्ये झाल्याने या उपक्रमाचे यश आता फळास येत आहे.
काउंसिलिंग राउंडच्या निकालात “सुपर ५०”च्या विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे यश संपादन केले आहे –
• हर्षल ढमाले (सिन्नर) – IIIT नागपूर – कॉम्प्युटर सायन्स
• डिंपल बागूल (मेहदर, कळवण) – IIT खरगपूर – इलेक्ट्रिकल
• वृशाली वाघमारे (मनमाड) – IIT धनबाद – इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (प्रथम फेरी)
• मेघा डहाळे (फडाळवाडी, त्र्यंबक) – IIT जोधपूर – बायोकेमिकल आणि IIT खरगपूर – फूड इंजिनिअरिंग
• आकांक्षा शेजवळ (कुंभारे, निफाड) – IIT धनबाद – केमिकल सायन्स
• जागृती शेवाळे (मोकभनगी, कळवण) – संत लोंगोवाल शासकीय अभियांत्रिकी संस्थेत नाव, (पुढील फेरीत अधिक चांगल्या पर्यायासाठी प्रयत्नशील)
या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे निःस्वार्थ मार्गदर्शन आणि “सुपर ५०” टीमचे नियोजनबद्ध प्रशिक्षण आहे. या निकालामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतात, हे अधोरेखित झाले आहे. या विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्था सशक्त करणाऱ्या जिल्ह्यासाठी सन्मान मिळवून दिला आहे, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
उपक्रमांचा अधिक विस्तार करु
“सुपर ५० उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले आहे, ते नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांनी देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवणे, हे त्यांच्या क्षमतेचं फलित आहे. हे केवळ यश नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात अशा उपक्रमांचा विस्तार करून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प राहील.”
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक