मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ झाल्याच्या गंभीर तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला आजच निलंबित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य किशोर दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी सदस्य मनीषा कायंदे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
दिनांक २७ जून २०२५ रोजी नाशिक जिल्हा परिषदेत गोपनीय पाकिटातून एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक व मानसिक छळाची निनावी तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून मंत्री श्री.गोरे म्हणाले की, संबंधित अधिकारी ‘अ’ वर्ग दर्जाचा असून, त्याच्यावर अनेक महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचा आरोप आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशाखा समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू आहे. तपास सुरू असलेल्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
संबंधित अधिकारी गेल्या १५–१६ वर्षांपासून नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत आहे, त्यामुळे तक्रारी गंभीर मानून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली आहे. तसेच अशाच स्वरूपाची आणखी एक निनावी तक्रार दुसऱ्या अधिकाऱ्याविरोधात प्राप्त झाली असून, त्यासंबंधी चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मात्र, या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याऐवजी सध्या सक्तीच्या रजेवर पाठवले जाणार असल्याचे मंत्री श्री.गोरे यांनी यावेळी सांगितले.