नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाच्या सर्व तालुक्यांच्या गटस्तरीय फेरी संपन्न झाल्यानंतर आता जिल्हास्तरीय अध्यक्ष चषकाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहेत. तर जिल्हास्तरीय स्पेलिंग बी व मॅथ्स बी स्पर्धेचे आयोजन दि. ३१ जानेवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा ही नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचे आयोजन केंद्र स्तरावर आणि बीट स्तरावर आणि त्यानंतर तालुकास्तरावर केले जाते. मागील वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेबद्दल आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्द संचय वाढावा यासाठी स्पेलिंग बी स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांमधील गणितीय ज्ञान या हेतूने मॅथ्स बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र स्तर बीट स्तर व त्यानंतर तालुका स्तरावर स्पेलिंग बी व मॅथ्स बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यातील प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चषकातील स्पर्धांचा उद्घाटन समारंभ हा दि. ४ रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे, कृषि मंत्री ना. अॅड माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून समारोप ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.