नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आज एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. “समावेशित शिक्षण” उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवडक दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व विशेष शिक्षकांना नाशिकमधील सिटी सेंटर मॉल येथील पीव्हीआर थिएटरमध्ये “सितारे जमीन पर” हा चित्रपट दाखविण्यात आला. सिटी सेंटर मॉलचे सर्वेसर्वा श्रीरंग सारडा यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी व्यवस्था करत सर्व उपस्थितांना अल्पोपहार देत आपल्या सामाजिक बांधिलकी दाखवली.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, समाजातील समावेशकतेचा संदेश पसरवणे व विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सकारात्मक प्रेरणा देणे हा होता. चित्रपटाद्वारे प्रत्येक मुलाच्या वेगळ्या क्षमतांना, कौशल्यांना समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली. विशेषतः, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अनुभव मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर अनेक शिक्षकांनी याचा त्यांना प्रेरणादायी लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि त्या गुणांना योग्य दिशा दिल्यास तो विद्यार्थी आपल्या जीवनात चांगले यश मिळवू शकतो, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास होण्यासाठी त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, हे या माध्यमातून ठळकपणे समोर आले. कार्यक्रमास प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर कनोज यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विशेष शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.