नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निखिल भामरे असे या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याला दिंडोरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन लवकरच त्याला अटक होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी नाशिक जिल्ह्यातील तरुण निखील भामरे याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले होते. या ट्विटचा फोटो राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केला. तसेच, त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिस, पुणे पोलिस, मुंबई पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक, ठाणे पोलिस यांना विनंती केली की संबंधित युवकावर योग्य ती कडक कारवाई करावी.
निखील भामरे हा तरुण फार्मसीचा विद्यार्थी आहे. तो मूळचा सटाणा येथील रहिवासी आहे. या युवकाने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’. ट्विटची ही भाषा आणि त्याचा उद्देश हा आक्षेपार्ह असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर हा युवक नाशिक जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
काय पातळी वर हे सगळे होते आहे … ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022