नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सावतानगर परिसरात एक अपघात घडला आहे. या अपघातात तरुणीने दुचाकी थेट एटीएम केंद्रात घातल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीट्वीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावतानगर परिसरातील महालक्ष्मी मंदिर चौकासमोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. तेथे ही घटना घडली आहे. एक तरुणी एसबीआय एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी दुचाकीवरुन आली होती. त्याचवेळी तिचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट एटीएम केंद्रात घुसली. यावेळी एटीएम केंद्राचा काचेचा दरवाजा तुटला आणि मोठा आवाज झाला. परिणामी, मोठा गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांनी एटीएंमकडे धाव घेतली. तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात नेण्यात आले. ही घटना एटीएम शेजारी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गौरी प्रदीप सैंदाणे (वय १८, रा. खांडे मळा, सावता नगर, सिडको असे अपघातग्रस्त तरुणीचे नाव आहे. गौरी ही सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी निघाली होती. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आली असता हा अपघात घडला आहे.