येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील जळगाव नेऊर येथे पैठणीच्या दुकानावर डल्ला मारत चोरट्यांनी रोख रक्कमेसह मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. येवला-नाशिक महामार्गावरील जळगाव नेऊर येथील प्रांजल पैठणी येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील बाजूस पैठणी दुकानाचा पत्रा कापून दुकानात आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोख रक्कम पंधरा हजार रुपये व मोबाईल लंपास त्यांनी केला.
ही सर्व चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत पैठणी दुकानदाराने येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या चोरीच्या घटनांना आळा बसावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे.