येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांद्याच्या करवाढीवर घेतलेल्या निर्णयावर राज्यभर आंदोलन चालू आहे. त्यातच आता कांदा अनुदान जमा होत नाही म्हणून येथील शेतकऱ्यांनी थेट राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा या आशयाचे निवेदन येथील पोलीस निरीक्षक विशाल क्षीरसागर यांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील व शेतकऱ्यांनी दिले आहे. यावेळी प्रा. प्रवीण निकम, राजेंद्र सोनवणे, उत्तम शिंदे, सिताराम गायकवाड, वाल्मीक शेळके, यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत लक्षवेधी मध्ये विचारले गेलेल्या प्रश्न उत्तरांमध्ये कांद्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते की, कांद्याचे अनुदान हे १५ ऑगस्टच्या आत जमा करण्यात येईल. परंतु, अद्याप देखील हे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे याबाबत कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने १५ ऑगस्ट या तारखेची वाट बघत होता. तसेच १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिन असल्यामुळे मंत्री आपली फसवणूक करू शकत नाही. स्वतंत्र दिनाचा आधार घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली फसवणूक याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील असे देखील या निवेदनात म्हटले आहे तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास हेच शिष्टमंडळ सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे आत्ताच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील कर ४० टक्के वाढवून शेतकऱ्याची कोंडी केली आहे. सध्याची परिस्थिती बघता नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. सध्या परिस्थितीत असलेले मका, सोयाबीन, टोमॅटो हे पिके पाण्याअभावी शेतकऱ्याला सोडून द्यावी लागत आहे. आधीच फार मोठ्या संकटाला शेतकरी सामोरे जात असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळवले आहे त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यावी.
शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकारने २४१० रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतिकिलो कांदा खरेदीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना २४ रुपये देणार होते परंतु अद्याप तशी कुठलीही परिस्थिती दिसत नाही. हीच बाब टोमॅटोच्या बाबतीत देखील झालेली आहे.
राज्यात सध्याच्या कांद्याचे परिस्थितीवर शेतकरी ज्या पद्धतीने न्याय मागत आहे. परंतु त्यांना न्याय मिळत नाही त्यांना तात्काळ न्याय मिळेल या भूमिकेत प्रशासनाने सहकार्य करून तात्काळ गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात म्हटले आहे. यावर येथील पोलीस निरीक्षक विशाल शिरसागर यांनी वरिष्ठांशी बोलून तात्काळ निर्णय घेतो असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात येवला येथे गुन्हा दाखल होतो की नाही याकडे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
Nashik Yeola Onion Issue Minister Abdul Sattar Cheating
Farmer Agriculture