नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या महत्वाच्या स्थळांचा विकास समाज कल्याण विभागाकडून विविध योजनांच्यां अतर्गत करण्यात येत आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त योजना राबविण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला व औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास कामांसाठी समाज कल्याण आयुक्तांनी नुकताच ७ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असल्याचा विकास होण्यासाठी चालना मिळणार आहे.
राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयाने सन २०२२-२३ या वर्षात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या दोन कामांसाठी यापूर्वीच आयुक्तालयाने रुपये ९ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे, तर नुकताच उर्वरित ७ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे . राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे सदर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सदर निधीतून नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मुक्ती भूमी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. सदर कामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता असुन यापूर्वी ९ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे तर उर्वरित ५ कोटी ५९ लाख रुपयांचा नुकताच वितरित करण्यात आला आहे. तर औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवश वसतीगृह व सभागृहाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
“ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या योजनेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी उर्वरित ७ कोटी,६५ लाख रुपयांचा निधी संबंधीत यंत्रणेस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला स्थानचा विकासाला गती मिळणार असून लवकरच ही कामे पूर्ण होणार आहे.*.”
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण
Nashik Yeola Muktibhumi Social Welfare Department Fund