येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येवला तालुक्यातील मुखेड येथील एका कार्यक्रमास त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर त्या नाशिककडे निघाल्या. त्याचवेळी रस्त्यात त्यांना मुखेड गावातील आरोग्य उपकेंद्र दिसले. त्यांनी अचानक या उपकेंद्राला भेट देण्याचे ठरविले. संपूर्ण ताफा उपकेंद्राच्या ठिकाणी थांबला. उपकेंद्रात जाताच डॉ. पवार यांना भोंगळ कारभाराचे दर्शन घडले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीच थेट उपकेंद्रात दाखल झाल्याने डॉक्टर आणि नर्स यांची चांगलीच धावपळ उडाली. काय करु आणि काय नको, असे त्यांच्यासाठी झाले होते. मात्र, जे व्हायचे तेच झाले. डॉ. पवार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. याउपकेंद्रामध्ये दिलेला स्टॉक आणि रजिस्टर मध्ये नोंदी यात मोठी तफावत आढळली. त्यामुळे डॉ. पवार यांनी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
उपकेंद्रातील सॅनिटरी नॅपकिन पडून असल्याचे त्यांचा निदर्शनास आले. शिवाय त्याबाबत देखील रजिस्टर मध्ये नोंद नव्हती. औषधांचा पुरवठा आणि रजिस्टर नोंदी यात कुठलाही ताळमेळ आढळून आला नाही. उपकेंद्रातील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी धारेवर धरत विचारणा केली.
आपल्याच मतदारसंघातील उपकेंद्रातील हा भोंगळ कारभार पाहून मंत्री डॉ. पवार संतप्त झाल्या. उपकेंद्रातील डॉक्टरांना त्यांनी चांगलेच सुनावले. तसेच, यापुढे सुरळीत कारभार करावा, अशी ताकीदही दिली. दरम्यान, मंत्र्यांच्या या अचानक पाहणी दौऱ्याची मुखेड गावासह येवला तालुक्यात जोरदार चर्चा आहे. अशाच प्रकारे मंत्र्यांनी अचानक भेटी देऊन वास्तव जाणून घ्यावे, अशी प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.