येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरट्यांची नजर आता थेट पैठणी साडीवर आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात चोरट्यांनी चक्क हातमागावर लावलेली पैठणी कापून चोरी केल्याची घटना आज उघडीस आली आहे. यामुळे तब्बल पावणे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पैठणी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
येवल्यातील पैठणी विणकर सोनू जामदार यांचे कोटमगाव येथे पैठणी साडी तयार करण्याचे हातमाग आहे. काल संध्याकाळी काम आटोपून ते आपल्या घरी आले. आज सकाळी ते पुन्हा पैठणी विण्यासाठी कोटमगाव येथे लवकर गेले. त्यावेळी घराचा कडी-कोयंडा तुटलेला त्यांना आढळून आला. घरात जाताच दोन्ही हातमागावर लावलेल्या पैठणी साड्या चोरट्यांनी कापून चोरुन नेल्याचे त्यांना दिसून आले.
पैठणी साठी लागणारे रेशमाची वगी व जरही चोरट्यांनी लांबविली आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या पैठणीसह त्यासाठी लागणारे अन्य सामान असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी येवला शहर पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र चोरट्यांनी पैठणी साडी पुर्ण होण्याआधीच चोरट्यांनी हातमागावर लावलेली पैठणी कापून चोरी केल्याने त्याचीच चर्चा सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Nashik Yeola Crime Paithani Saree Theft