येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूरमध्ये दोन जातीत वाद पेटवून दंगली घडवल्या आहेत. आता राजकारणासाठी यांना दंगलीच घडवायच्या आहेत. सरकार गप्प असल्यानेच तेथे अत्याचार वाढल्याची टीका माजी मंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. येथील महात्मा फुले नाट्यगृहात आयोजित पदाधिकारी संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू आहे. महिलांची नग्न धिंड काढली जाते. इतके कसे निर्ढावलेपण आहे. करगिलच्या युद्धात लढणाऱ्या जवानाच्या पत्नीवर अत्याचार होत असताना पोलीस काय करीत होते ? असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, यांना जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद व इतर वाद वाढवून दंगली घडवून राजकारण करायचे आहे.
आता ५० खोक्या वाल्यांची परिस्थिती ओके नाहीये. कारण त्यांनी मंत्री पदाची पूर्ण तयारी केली. ते शपथ विधीला पोहोचले, पण तेथे जाताच त्यांना दुसरीच नावे दिसली. मंत्री पदाच्या लायनीत खूप दिवसापासून आहेत, पण लिहून घ्या, त्यांना मंत्री पद मिळणार पण नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.एका वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला आहे. कारण वेदांता फॉक्सकोन सारखे मोठमोठे उद्योग गुजरातला गेले. ते प्रकल्प गुजरातला जाऊ दिले नसते तर येथील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र गुजरात मधूनही त्यांनी गाशा गुंडाळला आहे. यामुळे देशा बरोबरच येथील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकल्पा अगोदर हे ४० गद्दार ही गुजरातला गेले होते. हे ओरिजिनल ४० गद्दार महाराष्ट्राचा विचार करत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.
उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आघाडी सरकारने शेतकऱ्यांना २ लाख रुपये कर्जमुक्त केले. मात्र या ५० खोके वाल्यांची कर्जमुक्ती अद्यापही तुमच्या पर्यंत पोहोचली नाही. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रत्येकाला ते आपले मुख्यमंत्री वाटायचे. पण यांच्याकडे पहाताना तो फील कुणालाच येत नाही. खोके सरकार मना – मनात पोहोचले नाही. कोरोना काळात ताळेबंदी असताना उद्धव साहेबांनी ऑनलाईन अनेक मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले, योग्य ती काळजी घेतली. त्यांची दखल WHO ने घेतली. उद्धव साहेबांचं कौतुक केले. सर्वानी कौतुक केले. मात्र ४० गद्दारांनी धोका दिला. उद्धव ठाकरे लॉकडाऊन असताना ही ऑनलाईन बैठका घ्यायचे, आता मात्र राज्यात काहीही होवो, पण मुख्यमंत्री दिल्लीत असतात, असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले.राजकारचा चिखल झाला आहे. याची सर्वांनाच सल आहे. कारण स्वार्थासाठी राजकारण चालू आहे. ही दलदल साफ करण्यासाठी मला तुम्ही बरोबर हवे आहे, असे ठाकरे उपस्थित पदाधिकाऱ्यांना म्हणाले. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे. लोकांना हे पचलेलेच नाही, त्यामुळे आता आपली लाट येत आहे. मी पुन्हा ऑगस्ट मध्ये तुमच्या भेटीला येईन, असेही ठाकरे म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, उपनेते अद्वय हिरे, आमदार नरेंद्र दराडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सुरज चव्हाण, शिवसेना उपनेते सुनील बागुल, आमदार वैभव नाईक, माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गणेश धात्रक, नितीन आहेर, संभाजीराजे पवार, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ताजी गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ॲड. माणिकराव शिंदे, ॲड. शाहू शिंदे, काँग्रेसचे ॲड. समीर देशमुख, प्रितम पटणी, सेनेचे भास्कर कोंढरे, झुंजार देशमुख, निवृत्ती जगताप, रतन बोरणारे, शिवा सुराशे, संजय कासार, राजेंद्र लोणारी, प्रमोद पाटील, विक्रम रंधवे, बापू गायकवाड आदीसह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात समता परिषदेचे माजी शहर अध्यक्ष विष्णुपंत कऱ्हेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रितेश बुब तसेच रहेमत शेख, शकील पटेल, अबरार अन्सारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.