नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरची महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी आज पाहणी केली. सेंटरमधील अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था त्वरित करून येत्या ७ जुलै पासून नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या फाळके स्मारकात अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था करून नागरिक व पर्यटकांसाठी खुले केले आहे. त्याला शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.आत्तापर्यंत पंधरा दिवसात साधारण १०,००० (दहा हजार) पर्यटकांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरही नागरिक व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी बांधकाम व मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणी त्वरित सर्व बाहेरील परिसराची व तारांगणाची साफसफाई करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करणे, तारांगण परिसरात लॉन्स विकसित करणे, यु.पी.एस.सिस्टम, बॅटरीची दुरुस्ती करणेची व्यवस्था त्वरित करण्याचे आदेश दिले. त्याठिकाणी तिकीट विक्री केंद्रात बसण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मक्तेदाराच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर नागरिक व विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि. ७ जुलै २०२२ रोजी खुले करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
nashik Yashvantrao chavhan Planetarium opening