नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरात एप्रिल हा जागतिक लँडस्केप आर्किटेक्चर महिना म्हणून साजरा केला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन इंडियन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स अर्थात इसोला (ISOLA) कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच संस्थेच्या महाराष्ट्र च्या चॅप्टरने देखील गेल्या महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांचा समारोप दोन दिवसीय ‘रीडिंग लँडस्केप थ्रू ट्रायबल विजडम’ या थीम वर आयोजित करण्यात आला असून तो नाशिकमध्ये संपन्न होत आहे.
लँडस्केप आर्किटेक्चर अर्थात भूदृश्य वास्तुकला हा स्वतंत्र विषय असून फक्त झाडे लावणे या पुरता मुळीच मर्यादित नाही. ही एक कला आहे. ज्यात निसर्ग आणि मानव यांना एकमेकांशी जोडण्याचे महत्वाचे काम मोठ्या खुबीने केले जाते. ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून इसोलाचे महाराष्ट्र चॅप्टर राज्यात कार्यरत आहे. या क्षेत्राचा होत असलेला विस्तार, ज्ञानाची देवाणघेवाण, विद्यार्थी सहभाग, व्यावसायिकांना समृद्धसाठी प्रयत्न सोबतच कला, पर्यावरण आणि पर्यावरणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी इसोला नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करत असते.
लिव्हिंग लँडस्केप सेटिंग हा लँडस्केप आर्किटेक्चरचा एक भाग आहे. यामध्ये आदिवासी समुदायांची वस्ती आणि जीवनशैली अनुभवण्याचा एक मार्ग म्हणून आदिवासी कलांचा अभ्यास, शहरातील लोकांसाठी निसर्गाची कल्पना शोधण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे काय करू शकतो का? याचा शोध जागतिक लँडस्केप आर्किटेक्चर महिन्याच्या निमित्ताने इसोलाने ठरविले आहे. या अंतर्गत सदरचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये 29 एप्रिल 2023 रोजीचे पहिले सत्र महाराष्ट्रातील आदिवासींवर लक्ष केंद्रित असून ‘कला आणि सामुदायिक जीवन’ या विषयावर कल्याणी मुजुमदार, अभ्यासक व्याख्यान होणार आहे. तर दुसरे सत्र व्यावसायिक, संशोधक, संगीतकार, कलाकार, वक्त्या प्राची वैद्य (दुबले) या आदिवासी भारतातील संगीताचे लँडस्केप’ यावर सादरीकरण करणार आहेत. या सोबतच उपमुखम, बोहाडा आणि द तारपा प्लेअर या तीन माहितीपटांचे सादरीकरण देखील होणार आहे. दोन्ही कार्यक्रम वैराज कलादालन, शरणपूर नाशिक येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहेत.
या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप दुसऱ्या दिवशी रामखिंड जवळील जव्हारच्या आदिवासी वस्तीला भेट देऊन होणार आहे. सोबतच नाशिकमध्ये हस्तनिर्मित मुखवटा बनवण्याची कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी अनिवार्य आहे. तर अतिथी व्याख्यान विनामूल्य आणि खुले आहे. तर आदिवासी वस्ती भेट आणि कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
Nashik World Landscape Architecture Festival