नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता एक गंभीर प्रकार समोर आला आहे. दागिन्यांसाठी थेट महिलेची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही महिला आपल्याच घरात होती. तिच्यावर वार करुन चोरट्यांनी तिचे दागिने लुटले आहेत. जेलरोड भागातील या प्रकारामुळे संपूर्ण शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेल रोडच्या लोखंडे मळा भागातील हनुमंतनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर असे मृत महिलेचे नाव आहे. बेलेकर या लहान मुलगा दीपक व सून दीपाली यांच्यासह राहतात. त्यांचा मोठा मुलगा विवेक हा कुटुंबासह त्याच परिसरात राहतो. विवेक आणि त्याची पत्नी रविवारी (१८ जून) कामावर गेले होते. तर दीपालीच्या भावाचे शुक्रवारी लग्न असल्याने ती माहेरी गेली होती. तर, दीपक सुद्धा बाहेर गेलेला होता. त्यामुळे सुरेखा बेलेकर या घरी एकट्याच होत्या. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरी आले. त्यांनी बेलेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातातील दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची माळ चोरून ते पसार झाले. दरम्यान, या हल्ल्यात बेलेकर या गंभीर जखमी झाल्या. तसेच, त्यांना वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रात्री रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरी दुधवाला आला. त्याने आवाज दिला. पण, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने शेजारच्यांनाही आवाज दिला. त्यांनतर शेजारच्या रहिवाशांनी विवेकच्या घरी त्याच्या पत्नीला ही घटना सांगितली. त्या तातडीने सासूच्या घरी आल्या. पुढचा दरवाजा उघत नसल्याने त्यांनी मागील दरवाजाकडे गेल्या. सुरेखा बेलेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता. या घटनेची माहिती मिळताच दीपक आणि विवेक हे घरी दाखल झाले. तातडीने सुरेखा यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी आता तसाप सुरू केला आहे. अद्याप त्यांना काहीही हाती लागलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही सह अन्य बाबींद्वारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. आपण घरातही सुरक्षित नाहीत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे.