नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड काळात रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या रूग्ण महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास एक वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कैलास बाबुराव शिंदे (५६ रा.मोठा राजवाडा, भद्रकाली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०२० रोजी महापालिकेच्या कथडा येथील झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे घडली होती.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला या कोवीड -१९ पॉझिटीव्ह आल्याने त्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या होत्या. ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास रूग्ण महिला दवाखान्यातील शौचालयात गेली असता ही घटना घडली होती. आरोपीने टॉयलेटचा दरवाजा उघडून शौचालयात प्रवेश करीत पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. हा खटला प्रथम वर्ग न्यायालय कोर्ट क्र.२ चे न्या. कैलाश चाफळे यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड.विद्या देवरे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस भादवी कलम ५०९ अन्वये एक वर्ष साधा कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.