नाशिकच्या ‘त्या’ लग्नाबद्दल बच्चू कडू आणि प्रहारची ही आहे भूमिका
– अजय महाराज बारस्कर, प्रवक्ता, प्रहार पक्ष
नाशिक मधील दिव्यांग असलेली रसिका आणि आसिफ यांच्या ‘अरेंज मॅरेज’ वर झालेली टीका व चर्चा यामुळे सबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चर्चा सुरु होती. मी बच्चू भाऊंसोबत नाशिकला मुलीच्या घरी भेटायला गेलो याचं कारण एकच की रसिका ही अपंग अर्थात दिव्यांग आहे आणि दिव्यांग हे भाऊंचेच नव्हे तर आम्हां सर्वांचेच दैवत आहे. कुठल्याही दिव्यांगाला धडधाकट माणसाइतकेच चांगले जीवन जगण्याचा नैसर्गिक अधिकार आहे.
रसिकाच्या विवाहाला ‘लव जिहाद’ चा रंग दिल्याने सदर लग्नात विघ्न निर्माण झाले आणि रसिका तिच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्याकरता आम्ही त्यांच्या घरी गेलो. मुलीच्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्यावर लक्षात आले की हे प्रकरण ‘लव जिहाद’ या प्रकरणातील नाहीच तर हे एक प्रकारचे ‘अरेंज मॅरेज’ आहे. दोन्ही कुटुंबांनी परस्परांच्या स्वखुशीने घेतलेला निर्णय होता. यात धर्म बदलण्याचाही विषय नव्हता किंवा तशी सक्तीही केलेली नाही. तसाच मुलामुलीने पळून जाण्याचाही विषय नव्हता. कोणावर बळजबरी केलेली नव्हती अथवा कोणी कोणाच्या मजबुरीचा फायदा ही घेतला नव्हता.
मुलगी दिव्यांग असल्याने हिंदू धर्मातल्या कोणत्याही मुलाने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली नाही, हे कोणी लक्षात घेतले नाही.रसिकाच्या वडिलांनी आपल्या मुलीला सुयोग्य स्थळ पाहण्याचे,तिच्या लग्नाचे प्रयत्न दहा वर्षे केले. मात्र एकही दिव्यांग अथवा धडधाकट ‘माई का लाल ‘ पुढे आला नाही. मात्र शेजारी राहणारा आसिफ जो सक्षम, उच्च विद्याविभूषित आहे. त्याने तिच्याशी लग्नाची तयारी दाखवली.
विशेष म्हणजे या मुलांनी हिंदू धर्म पद्धतीने ब्राम्हणाच्या हातून विवाह लावण्यासाठी संमती दिली त्यासाठी त्याला आधी हिंदू व्हावे लागेल सर्व विधी करावे लागतील हे सुद्धा मान्य केले आणि हिंदू धर्म पद्धतीनेच पत्रिका सुद्धा छापली गेली. एखादा मुस्लीम मुलगा हिंदू धर्म पद्धतीने विवाह करतोय तर मग धर्मांतर झाले कुठे ? वाद करण्याचे कारणच काय ? पण केवळ द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना काहीतरी संधी पाहिजे असते आणि या निमित्ताने त्यांनी ही संधी शोधली. आपल्या मुलीला हा मुलगा सुखी ठेवेल अशी अशी खात्री मुलीच्या वडिलांची झाल्यामुळे त्यांनी हे लग्न जमवले,ही गोष्ट भाऊंच्या लक्षात आली आणि म्हणून भाऊंनी त्यांना समर्थन दिले.
रसिका ही दिव्यांग अपंग आहे तर आसिफ हा उच्चविद्याविभूषित आणि शारीरिक व आर्थिक शैक्षणिक रित्या सक्षम आहे, अपंग नाही हे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तो एका दिव्यांग मुलीला स्वीकारतो हेच खरे धाडस आणि प्रेम आहे. आम्ही स्वतः त्यांना भेटलो व त्यांच्या भावना जाणून घेतल्या.मुलीचे ऐंशी वर्षाचे आजोबा हे गांधीवादी आहेत “ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा” या शब्दात आजी व आजोबां नातीच्या विवाहाच्या समर्थनात उभी राहिले.
अपंग व्यक्तीच्या विवाह बाबत नेहमी असे घडते की दुसरा साथीदार अपंग मिळतो.मग घरच्या व्यक्तींना दोघांना संभाळून घेण्याची कसरत करावी लागते. एखाद्या सर्वच दृष्ट्या सक्षम व्यक्तीने अपंगासोबत विवाहास होकार द्यावा ही घटना क्रांतिकारक नाही काय?मग केवळ धर्म वेगळा आहे म्हणून टीका करण्यात काय हशील आहे?
धर्म बदलविण्यासाठी किंवा मुस्लिम करण्यासाठी तसेच आर्थिक लाभासाठी मुलींना फसून जाळ्यात ओढतात या गोष्टीचे भाऊंनी कधीही समर्थन केले नाही . हिंदू-मुस्लिम प्रेमप्रकरणाचे, लव जिहादचे भाऊंनी कधीही समर्थन केले नाही आणि त्याचा विरोधही केलेला नाही. प्रेम किंवा विवाह ही खाजगी स्वरूपाची बाब आहे.परंतु नाशिकच्या आडगावकर या परिवाराची गोष्ट अगदी वेगळी आहे रसिका आडगावकर व आसिफ पठाण यांचे ‘लव जिहाद ‘ नाहीच.ते एक प्रकारचे ‘अरेंज मॅरेज ‘ आहे.दोन्ही कुटुंबाने अगदी वाजत गाजत जाहीर स्वरूपाने हे लग्न लावण्याचे ठरवले होते.
सामान्यतः ‘लव जिहाद ‘ प्रकरणात मुलीला फुस लावून पळवून नेले जाते. इथे मात्र असा काहीही प्रकार नाही. दोन्ही कुटुंबांनी परस्परांच्या मर्जीने हा विवाह करावयाचा ठरला होता. यामध्ये विरोध करण्याचा इतरांचा काहीएक संबंध येत नाही आणि जर करायचाच झाला तर गेल्या दहा वर्षांत रसिकाला स्वीकारणारा एकही हिंदू का पुढे आला नाही?
समाजामध्ये अनेक वेळा मुला मुलींचे आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह होतात यामध्ये बऱ्याच अंशी मुलांकडून कटकारस्थान करून, खोटे नाव सांगून श्रीमंतांच्या मुलींना फसविण्याचे प्रकार झालेले आहेत. असे इथे काहीही झाले नाही.
मी या ठिकाणी जाणीवपूर्वक ‘श्रीमंतांच्या मुलींना ‘ हा शब्द वापरला आहे. काही मुले श्रीमंतांच्या मुलींना फसवितात,भुलवतात हेही एक वास्तव आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलामुलींना कमी समज असते.नैसर्गिक, शारीरिक आकर्षण आणि अंतर्मनावर जोडीदाराचे पडलेले भावनिक आकर्षण या प्रकारात मुलामुलींची वास्तववादी ,व्यवहारी बुद्धी काम करत नाही.त्यामुळे तरुण किंवा तरुणी भावनिक जाळ्यात अडकलेले जातात. अशाप्रकारे घरच्यांचा विरोध पत्करून ज्यावेळी त्यांचे लग्न होते आणि वास्तव जगामध्ये संसारामध्ये या जोडप्याचे व्यवहार चालू होतात तेव्हा आर्थिक-सामाजिक अडचणींचा सामना या जोडप्यांना करावा लागतो. आर्थिक प्रश्न निर्माण झाला की बऱ्याच वेळी नाती टिकत नाहीत मग फसवणूक झाल्याचा निष्कर्ष निघतो.
द्वेषाची भावना ही सर्व धर्मांनी आणि संतांनी निंदनीय मानली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।। ‘ द्वेष मत्सर लोभ,क्रोध, काम,मोह या भावना विकार या शब्दात संतांनी निंदनीय केल्या आहेत. यांच्या बाबत प्रत्येक शब्दाची यथोचित व्याख्या संतांनी केल्या आहेत. कट कारस्थान करून ज्यांनी पैशासाठी खोटे प्रेम केले त्याठिकाणी फसवणुक आहेच. फसवणूक केली असेल त्याला धडा शिकवलाच पाहिजे.पण जिथे असे घडले नाही तिथेही त्या घटनेचा विपर्यास करून तथाकथित द्वेषाची भावना सरसकट पसरविली जाते. सर्व मुस्लीम म्हणजे फसविणारे कट-कारस्थानी ,अतिरेकी आहेत असं भासविण्यात येते. हिंदुत्व म्हणजे अन्य धर्मियांना शत्रू ठरवणे नव्हे.
वास्तविक पाहता कोणतीही जात किंवा कोणताही धर्मातील सर्वच्या सर्व माणसे चांगलीही नसतात आणि सर्वच वाईटही नसतात .चांगले किंवा वाईट हा मापदंड हा धार्मिक किंवा जातीयतेच्या अंगाने न घेता तो व्यक्तीपरत्वे मापदंड असावा.
दुसऱ्या बाजूला भाजपातील मोठे नेते शाहनवाज हुसेन मुक्तार अब्बास नकवी यांनी हिंदू स्त्रियांशी विवाह केले तेव्हा धर्म संकटात आला नाही,तिथे लव जिहाद नाही. मात्र इथे सर्वसामान्यांच्या घरी असा प्रसंग आला की धर्म संकटात येतो, हे काय गणित आहे? भाजपात असले की सर्व काही माफ होते पतित सुद्धा ‘पावन ‘ होतात भाजपात गेले की भ्रष्टाचारी स्वच्छ होतात हा काय प्रकार आहे?स्वतः बच्चूभाऊंनी अशी आंतरधर्मीय विवाहांची एक मोठी यादी दिली आहे.
सनातनी हे नेहमी धर्मावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत असतात.हिंदू धर्मामध्ये सती जाण्यासारखे अत्यंत घाणेरडी प्रथा होती तिचे सुद्धा समर्थन सनातनी मंडळी करत होती. राजा राम मोहन राय यांनी याविरुद्ध आवाज उठवला तेव्हाही खूप टीका सनातन्यांनी केली.
छत्रपती शिवरायांनी बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांना मुसलमानातून हिंदू करताना सुद्धा सनातनी आडवे पडले होते.सावित्रीबाई फुले यांना सनातनी लोकांनी दगड शेण मारले. तुकोबारायांना यांनीच त्रास दिला शिवरायांच्या राज्याभिषेकाला यांनीच विरोध केला.महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला विधवा विवाह केला त्यावेळी सनातनी,कडव्या लोकांनीच महर्षी कर्वेना प्रचंड त्रास दिला.आजही हे कडवे सनातनी या ना त्या रूपात शिल्लक आहेत. शेवटी ‘सत्याचा सायास करणे म्हणजेच वारकरी असणे होय ‘ तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे बरा सत्याचा सायास !!
जे सत्य असेल चांगले असेल विशेष करून दिव्यांगांच्या हिताचे असेल तेथे मी जात राहील. अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. रसिकाच्या निमित्ताने सर्व प्रिंट मीडिया आणि न्यूज मीडियाने वास्तववादी भूमिका घेऊन, सत्य परिस्थिती समाजासमोर आणली ,ही एक मोठी जबाबदारीची गोष्ट आहे, अभिनंदनीय गोष्ट आहे.
भाऊंच्या या मानवतावादी भूमिकेबद्दल सोशल मीडियामधून भाऊंवर अत्यंत जहरी आणि खालच्या स्तरातून टीका केली गेली. वास्तविक पाहता बच्चू कडू यांनी कधीही लव्ह जिहादचे समर्थन केलेले नाही उलट ज्या ज्या ठिकाणी प्रेमप्रकरणातून पैशासाठी मुलींची फसवणूक झाली आहे त्या ठिकाणी अशा करणाऱ्या मुलांना धडा शिकवण्याचे काम बच्चू कडू यांनी केलेले आहे. परंतु आज रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं दाखवण्यात आलंय की बच्चू कडू म्हणजे लव्ह जिहाद चे पाठीराखे आहेत. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे केवळ बच्चू कडू यांना बदनाम करण्यासाठी राजकीय षड्यंत्र आहे.
तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे मोर नाचवी मयुरे! लपविता खरे येत नाही!!
टीकाकारांना माझं सांगन आहे सत्य हे कधीही लपवता येत नाही. टीका करणारे नेहमी अर्धसत्य सांगत असतात. एकाने तर ‘लव जिहाद पीडीतेचे वडीलांच्या ‘ नावाने खोटी पोस्ट टाकली , ती नंतर डिलीटही केली. पण एकाही टीकाकाराने रसिकाच्या दिव्यांगाचा अपंगाचा उल्लेख केला नाही किंवा मानवतेच्या पातळीवर जाऊन खरा मुद्दा समजून घेतला नाही. या लोकांना माझा एक प्रश्न आहे की एवढी जर धर्माची काळजी आहे तर का नाही रसिकाला स्वीकारणारा मुलगा इतक्या वर्षांत पुढे आला? नट-नटया राजरोस आंतरधर्मीय विवाह करतात, तिथे का ही मंडळी गप्प बसतात?तिथे लव जिहाद नाही का? कुठे गेली थोर भारतीय संस्कृती?
धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेण्याच्या, हिंसेच्या पोस्ट राजरोस फिरताहेत, यातून कोणती सहिष्णुता आपण पोसणार आहोत? रसिकाच्या लग्नासाठी तिचे वडिल दहा वर्षे प्रयत्न करत होते तेव्हा कुठे गेले होते हे धर्मरक्षक? रसिकाला आयुष्यभर आई वडिलांनी सांभाळायचे का?तिने लग्न करून सुखी होऊच नये का?अपंगत्वाची सजा तिने अशीच भोगत बसायचे का? तेव्हा धार्मिक रंग देऊन विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या दिव्यांग मुलीच्या आयुष्यात एक सोनेरी पहाट फुलवण्याच्या नेक कामासाठी आपले हिंदुत्व पणाला लावावे, यात भलाई नाही का? हिंदुत्व म्हणजे मानवता नाकारणे नव्हे.
हिंदुत्वाचा इतका संकुचित अर्थ कधीही नव्हता आणि नाही. शिवाय आणखी एक गोष्ट झाली की एरवी संविधानिक मूल्यांची पायमल्ली झाली की आग ओकणारे पुरोगामी या वेळी दातखीळ बसल्यासारखे गप्प झाले. थोडे काही सुजाण नागरिक वगळता एकाही विचारवंताने, चळवळीवाल्याने , समाजातल्या कोणीही भाऊंच्या मानवतावादी भूमिकेबद्दल काही वक्तव्य केले नाही. एवढी दहशत नेमकी कशाची आहे? अशा पध्दतीने श्रेयस्कर मौन बाळगल्यास लोकशाही किती दिवस जिवंत राहील, याचाही विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.