नाशिक – गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नाशिक महापालिकेने पाणी कपातीबाबतचा निर्णय घेतला आहे. गंगापूर धरणात अल्प साठा असल्याने आगामी काळाचा विचार करुन महापालिकेने शहरात एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचे निश्चित केले. त्याची अंमलबजावणी गेल्या दोन आठवड्यांपासून करण्यात येत आहे. मात्र, आता धरणसाठ्यात वाढ झाली आहे. त्याची दखल घेत महापालिकेने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही धरण १०० टक्के भरलेले नाही. त्यामुळे नाशिककरांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. जेणेकरुन धरणातील पाणीसाठा आपल्याला योग्यरितीने उपयोगात आणता येईल. तसेच, आगामी काळात पाऊस न झाल्यास योग्य पद्धतीने पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागेल, असे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले आहे.