नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर हे आज चक्क व्हीआयपी बनले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह तब्बल अर्धा डझन मंत्री आज नाशिकमध्ये आहेत. राज्यपालांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बालासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी मंत्री आज नाशिकमध्ये आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांनी शहर परिसरात अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
राज्यपालांचे स्वागत
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नुकतेच नाशिक (ओझर) विमानतळावर आगमन झाले असून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रवाना झाले.