मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिक जिल्ह्यात देवळाली व दिंडोरी विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाने एेनवेळी हेलिकॅाप्टरने एबी फॅार्म पाठवून राजश्री अहिरराव व धनराज महाले यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानंतर आता या दोन्ही उमेदवारांना माघार घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. पण, आता हे उमेदवार नॅाट रिचेबल झाले आहे. या दोन्ही उमेदवारांनी माघार उद्यापर्यंत मुदतीत न घेतल्यास त्यांची उमेदवारी पक्षाच्या चिन्हांसह कायम राहणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये खडा पडण्याची शक्यता आहे.
देवळालीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना तर दिंडोरीत आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली आहे. पण, शिंदे गटाने या दोन्ही मतदार संघात एेनवेळी उमेदवार दिले. पण, आज महायुतीच्या बैठकीत या दोन्ही उमेदवारांना माघार घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे उद्या नेमकं काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दोन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्यास निवडणूकीच्या नियमाप्रमाणे त्यांचे अर्ज चिन्हासह कायम राहतात. पक्षाने अर्ज दिल्यानंतर त्यात बदल होत नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची अडचड झाली आहे. दरम्यान नांदगाव विधानसभा मतदार संघात महायुतीने काय निर्णय़ घेतला हे अद्याप पुढे आले नाही.