नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ *आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक व संगीतकार विक्रम हाजरा यांच्या भक्ती संध्या* या कार्यक्रमाने होणार आहे. सोमवार दि. 1 मे रोजी सायं. 7:00 वाजता देवामामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक येथे सुरू होणाऱ्या या व्याख्यानमालेत 31 मे 2023 पर्यंत दररोज देश-विदेशातील नामांकित वक्ते आपले विचार मांडणार आहेत.
व्याख्यानमालेच्या शुभारंभ कार्यक्रमास बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार-आमदार, प्रमुख प्रशासकीय अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष उद्योगपती देवकिसन सारडा, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सर डॉ. एम. एस. गोसावी तसेच दिवंगत अध्यक्षांचे वारस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर विक्रम हाजरा यांचा भक्ती संध्या या कार्यक्रमाने संपूर्ण गोदाघाट भक्ती रसाने निनादणार आहे.
विक्रम हाजरा यांचा परिचय
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कलाकार विक्रम हाजरा हे भारतीय भक्ती संगीतातील अग्रगण्य नाव आहे. विक्रम हाजरा हे अनेक पैलू असलेल्या हिऱ्यासारखे आहेत. ते श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराशी संबंधित लेखक , तत्त्वज्ञ, आध्यात्मिक मार्गदर्शक, शिक्षक आणि प्रोग्रामर आहेत. तथापी मुळात ते एक संगीतकार आहेत, जे केवळ संगीत निर्माण करीत नाहीत तर ते एक आध्यात्मिक रॉकस्टार आहेत. जे त्यांच्या श्रोत्यांच्याच आत्म्यापर्यंत जाणारे जणू एक दार उघडतात.
त्यांनी आजपर्यंत 20हुन अधिक अल्बम आणि सुमारे 50 देशांमध्ये जॅमपॅक्ड कॉन्सर्ट केलेल्या आहेत. भक्ती संगीतात चक्क इलेक्ट्रिक गिटार आणि जॅझ-रॉक सारखा माहौल आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. या अशा जागतिक संगीत शैलीमध्ये लोकसंगीत, पारंपरिक मंत्र आणि प्राचीन तत्वज्ञान सादर करणारे ते पहिले असल्याने त्यांच्या कार्यक्रमास एक रोमांचक स्वरूप प्राप्त होते.
विक्रम हाजरा यांनी लंडनच्या ब्लुम्स बरी थिएटर पासून ते जोहान्सबर्गचे लिंडर ऑडिटोरियम, दिल्लीचे सिरी फोर्ट ऑडिटोरियम, मुंबईचे षण्मुखानंद हॉल, रॉयल ऑपेरा हाऊस आणि NCPA टाटा थिएटर अशा प्रतिष्ठित ठिकाणी सादरीकरण केले आहे. आपल्या नाशिक मध्येच बासरीवादक पंडित रोनू मुजुमदार यांनी आयोजित केलेल्या 5000 हून अधिक कलाकारांच्या बासरीवादनाच्या वेणूनाद या अतिभव्य कार्यक्रमात 300000 हून अधिक प्रेक्षकांसह पं. हरिप्रसाद चौरसिया आणि प. पू. श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत श्री विक्रम हाजरा यांचे सादरीकरण नाशिककर श्रोत्यांना नेहमीच आठवते. माहे मे 2010 च्या व्याख्यानमालेचा समारोप विक्रम हाजरा यांच्या सादरीकरणाने झाला होता.
शताब्दी वर्षानिमित्त य.म. पटांगणावर व्याख्यानमालेने 70 फूट लांबीचे भव्य व्यासपीठ उभारले असून त्यावर 40 X 12 चा भव्य LED स्क्रीन उभारण्यात आला आहे.
पटांगणावर आनंद ढाकीफळे यांच्या संकल्पनेतून अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे.
या भव्य व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रारंभी दररोज विविध शाळांचे विद्यार्थी प्रार्थना गीत सादर करणार आहेत.
व्याख्यानमालेत देश-विदेशातील सुप्रसिद्ध, अभ्यासक, विचारवंत वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत त्यानंतर रात्री 8:45 ते 10 वाजेपर्यंत स्थानिक कलावंत गाणी, नृत्य, चित्र, कविता इत्यादी कार्यक्रम सादर करणार आहेत.
व्याख्यान व कार्यक्रमांचे प्रसारण केबल टी व्हीवर करण्यात येणार आहे तसेच यु ट्यूब, फेसबुक यावरदेखील दर्शक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकणार आहे. यासाठी लिंक पुढीलप्रमाणे :-
*वेबसाईट*
www.vvmalanashik.org
*युट्यूब पेज*
www.youtube.com/vvmalanashik2023
*फेसबुक पेज*
www.facebook.com/vvmalanashik
*इन्स्टाग्राम पेज*
www.instagram.com/vvmalanshik/
व्याख्यानमालेच्या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.
*उद्याचे व्याख्यान*
मंगळवार दि. 2 मे सायं 7
*स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यान*
डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नेतृत्वाखालील यशराज कलापथक, मुंबई यांचे सुमारे 40 कलावंत *रंग शाहिरीचे* हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
Nashik Vasant Vyakhyanmala From Today