नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या ज्ञानयज्ञात जगाच्या विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 11 नामवंत व्यक्तींबरोबरच ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त कोकणी साहित्यिक दामोदर मावजो, इंग्रजी भाषेत 13 कादंबऱ्या लिहून त्यापैकी 5 कादंबऱ्यांवर लोकप्रिय चित्रपट देणारे तरुण तडफदार लेखक चेतन भगत, पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आपले विचार मांडणार आहेत.
वसंत व्याख्यानमाला शताब्दी वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे बंदरे व खनिकर्म मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे आणि व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आज एका पत्रकान्वये शताब्दी वर्ष कार्यक्रमाची घोषणा केली.
व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाकरिता केंद्रीय रस्ते , वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी आमंत्रणही स्वीकारले आहे. तथापि त्यांचा अधिकृत कार्यक्रम निश्चित व्हावयाचा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यस्ततेमुळे येऊ शकणार नसल्याचे कळविले असून कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील येण्याची शक्यता कमी आहे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचा समारोप दि. 31 मे रोजी सोनी मराठी या मनोरंजन वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाने होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेते प्रसाद ओक, सुत्रसंचालिका प्राजक्ता माळी यांच्यासह अरुण कदम, समीर चौघुले यांच्यासह 25 कलावंत सहभागी होणार आहेत.
दि. 1 मे ते 31 मे 2023 रोजी दररोज सायं. 7:00 वाजता गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे होणाऱ्या व्याख्यानमालेत जागतिक कीर्तीचे डॉ. रवी गोडसे, चंद्रशेखर चव्हाण, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. नितीन जोशी, सौ. विद्या जोशी हे अमेरिकेतील मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. मूळचे कोपरगाव येथील रहिवासी असलेले फ्रान्स देशात उत्तुंग कामगिरी करणारे अमित केवल तसेच अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले आणि आता साऊथ कोरिया येथील सेऊल विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रोहिदास आरोटे, स्वीडन येथील जागतिक कीर्तीचे विचारवंत इश्तीयाक अहमद, लंडन येथील शिक्षणतज्ज्ञ माधवी आमडेकर , संरक्षण साहित्याचे जर्मनी येथील पुरवठादार भरत गिते, जगातील उत्कृष्ट महिला वैमानिक कॅप्टन निलम इंगळे, पर्यावरण क्षेत्रात जगातील 9 देशांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रसाद सेवेकरी, दुबई येथे पेशवा हे लोकप्रिय शाकाहारी हॉटेल चालविणाऱ्या सौ. श्रिया जोशी हे वक्ते यंदाच्या व्याख्यानमालेचे आकर्षण असणार आहेत. नितीन जोशी व प्रसाद सेवेकरी मूळचे नाशिक येथील रहिवासी आहेत.
सन 2022 चे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांचा नागरी सत्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाशिकचे श्रध्दास्थान कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना 1988 साली ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठी आणि कोकणी भाषा या एकमेकांच्या बहिणी म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे हा नागरी सत्कार समारंभ व्याख्यानमालेने आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका तसेच देणगीदार यांच्या सहकार्याने संपन्न होते असलेले व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष यशस्वी करण्यासाठी नागरी स्वागत समितीचे अध्यक्ष ना. दादाजी भुसे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेचे पदाधिकारी विजय हाके, सौ. उषा नवलनाथ तांबे, प्रा. संगिता राजेंद्र बाफणा, मनिष सानप, हेमंत देवरे, गणेश भोरे, ऍड. हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे, सुनिल गायकवाड, रुचिता ठाकूर, ऍड. कांतीलाल तातेड, विजय काकड, प्रा. कृष्णा शहाणे, संदीप नाटकर आदी परिश्रम घेत आहेत. व्याख्यानामालेच्या या कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि शताब्दी वर्ष यशस्वी करावे असे आवाहन मालेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेची महिनाभराची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे
*शताब्दी वर्ष – २०२३*
*वसंत व्याख्यानमाला, नाशिक.*
दि. १ मे ते ३१ मे २०२३, सायं ७:०० वाजता
स्थळ :- देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक – ३.
*कार्यक्रम पत्रिका*
सोमवार दि. १ मे २०२३
वक्त्याचे नाव आणि विषय नंतर जाहीर करण्यात येईल.
मंगळवार दि. २ मे २०२३
वक्ते :- *लोकशाहीर स्व. कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नेतृत्वाखालील यशराज कलापथक, मुंबई यांचा कार्यक्रम*
विषय :- *रंग शाहिरीचे*
बुधवार दि. ३ मे २०२३
वक्ते :- वक्त्यांचं नाव आणि विषय नंतर जाहीर करण्यात येईल.
गुरुवार दि. ४ मे २०२३
वक्ते :- वक्त्यांचं नाव आणि विषय नंतर जाहीर करण्यात येईल.
शुक्रवार दि. ५ मे २०२३
वक्ते :- *प्रा. रोहिदास आरोटे, साऊथ कोरिया*
विषय :- *विज्ञानाशी जडले नाते*
शनिवार दि. ६ मे २०२३
वक्ते :- *श्री. प्रसाद सेवेकरी, पुणे*
विषय :- *आपत्ती व्यवस्थापन, मानवतावाद आणि आपण*
रविवार दि. ७ मे २०२३
वक्ते :- *डॉ. रमण गंगाखेडकर, नवी दिल्ली*
विषय :- *भारताचा कोविड विरुद्धचा लढा*
सोमवार दि. ८ मे २०२३
वक्ते :- *ब्रम्हाकुमारी संतोष दिदी, माउंट अबू*
विषय :- *आध्यात्मिक ज्ञानद्वारा जीवन मे सुख शांती की प्राप्ती*
मंगळवार दि. ९ मे २०२३
वक्ते :- *इश्तियाक अहमद, स्वीडन*
*ज्येष्ठ लेखक, पत्रकार, विचारवंत*
विषय :- *जत्रेत हरवलेल्या दोन भावांची कथा*
*भारत-पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे, सामाजिक-राजकीय मार्ग आणि त्यांनी एकमेकांशी कसे वागावे, एक सूचना*
बुधवार दि. १० मे २०२३
वक्ते :- *श्री. सी. डी. मायी, कृषितज्ज्ञ, नागपूर*
विषय :- *भविष्यातील भारतीय शेती*
गुरुवार दि. ११ मे २०२३
वक्ते :- *श्री. सचिन-सौ. श्रिया जोशी, दुबई*
विषय – *प्रवास एका अन्नपूर्णेचा*
शुक्रवार दि. १२ मे २०२३
वक्ते :- *श्री. शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे*
विषय :- *प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा*
शनिवार दि. १३ मे २०२३
वक्ते :- *डॉ. गौरी कानिटकर, अनुरूप विवाहसंस्था, पुणे*
विषय :- *विवाह संस्थेचे बदलते स्वरूप*
रविवार १४ मे २०२३
वक्ते :- *श्री. शिवरत्न शेटे, शिवचरित्रकार सोलापूर*
विषय :- *शिवशंभू : पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध*
सोमवार दि १५ मे २०२३
वक्ते :- *ज्ञानपीठकार श्री. दामोदर मावजो, गोवा*
विषय :- *श्रेयस की प्रेयस*
मंगळवार दि. १६ मे २०२३
वक्ते :- *सौ. माधवी आमडेकर, लंडन, ब्रिटन*
विषय :- *विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य*
बुधवार दि. १७ मे २०२३
वक्ते:- *श्री. महेश भागवत, विशेष पोलिस महानिरीक्षक, तेलंगणा, हैद्राबाद*
विषय :- *स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक*
गुरुवार १८ मे २०२३
वक्ते :- *ॲड. नितीन जोशी, अमेरिका*
विषय :-
*अमेरिकेतील मराठी समाज*
*काल-आज-उद्या*
*याबाबत प्रकट मुलाखत*
शुक्रवार दि. १९ मे २०२३
वक्ते :- *डॉ. रवी गोडसे, अमेरिका*
विषय :- *वैद्यक शास्त्रातील विनोद*
शनिवार दि. २० मे २०२३
वक्ते :- *कॅप्टन निलम इंगळे, एअर इंडिया पायलट, मुंबई*
विषय :- *नभांगण*
रविवार दि. २१ मे २०२३
वक्ते :- *श्री. अमित केवल, फ्रान्स*
विषय :- *वाईन @ नाईन*
*भारतीय वाईन उद्योगाला आकार देणारे ९ बदल*
सोमवार दि. २२ मे २०२३
वक्ते :- *श्री. चेतन भगत, नवी दिल्ली*
विषय :- *नेतृत्वगुण, मूल्य यांच्या बळावर जीवनातील सर्वोच्च उद्दिष्ट कसे गाठावे ?*
मंगळवार दि. २३ मे २०२३
वक्ते :- *डॉ. चंद्रशेखर चव्हाण, अमेरिका*
विषय :- *नेत्र आणि दृष्टी*
बुधवार दि. २४ मे २०२३
वक्ते :- *श्री. भरत गिते, जर्मनी/पुणे*
विषय :- *मेक इन इंडिया – पायाभूत सुविधा क्षेत्र*
गुरुवार दि. २५ मे २०२३
वक्ते :- *श्री. देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार, नागपूर*
विषय :- *महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील नागरीक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का ?*
शुक्रवार दि. २६ मे २०२३
वक्ते :- *श्री. ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, नवी दिल्ली*
विषय :- *देशविदेशातील अद्भुत अनुभव*
शनिवार दि. २७ मे २०२३
वक्ते :- *श्री. राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली*
विषय :- *भारतातील सद्य राजकीय स्थिती*
रविवार दि. २८ मे २०२३
वक्ते :- *प्रा. सौ. धनश्री लेले, ठाणे*
विषय :- *महाकवी सावरकर*
सोमवार दि. २९ मे २०२३
वक्ते :- *सौ. विद्या जोशी, अमेरिका*
विषय :- *भारता बाहेरील भारत*
मंगळवार दि. ३० मे २०२३
वक्ते आणि विषय नंतर जाहीर करण्यात येईल.
बुधवार दि. ३१ मे २०२३
*सोनी मराठी टीव्ही वरील लोकप्रिय मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण*
*सहभाग :- सई ताम्हणकर, प्रसाद ओक, प्राजक्ता माळी यांच्यासह २५ कलावंत*
Nashik Vasant Vyakhyanmala 100 Years Attraction Schedule