वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी-सापुतारा महामार्गावरील खोरी फाट्या जवळ मारुती सियाज कार आणि क्रूझर यांच्यात समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात विनायक गोविंद क्षिरसागर (वय ३७), योगेश दिलीप वाघ (वय १८), जतिन अनिल फावडे (वय २३), रविंद्र मोतीचंद चव्हाण (वय २२) या चौघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मोठा कोळीवाडा, वणी येथील रहिवासी आहेत. हे चारही जण सियाज कार (एम एच ४१व्ही७७८७) ने सापुताऱ्याकडून वणीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी समोरुन क्रूझर ही गाडी येत होती. आणि अचानक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातावेळी प्रचंड मोठा आवाज झाला. तो ऐकून परिसरातील नागरिक अपघातस्थळी धावसे. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. काहींनी पोलिस आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला.
अपघाताची माहिती कळताच वणी पोलीसांसह वणीतील काही नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील ९ गंभीर जखमींना नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. क्रूझर गाडीतील ९ जण जखमी आहेत. क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे (वय ४०), कल्पना सुभाष सोळसे (वय १९), तुळशीराम गोविंदा भोये (वय २८), ललीता युवराज कडाळे (वय ३०), रोहिदास पांडुरंग कडाळे (वय २५), योगेश मधुकर सोळसे (वय १५), सुभाष काशिनाथ सोळसे (वय १५), देवेंद्र सुभाष सोळसे (वय ४७), नेहल सुभाष सोळसे (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वणी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल महाले यांच्या मदतीला नेहमी प्रमाणे पांडाणे आरोग्य केंद्राचे डॉ. प्रकाश देशमुख, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. अनिल शेळके, डॉ. आहेर, डॉ. योगेश पाटील, डॉ. डॉ. वैभव मोहिते आदी खाजगी डॉक्टर धावून आले. या सर्व डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले.