नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या १० ते १५ दिवसांपासून सुरु असलेली दहशत अखेर संपुष्टात आली आहे. नाशिकरोडच्या उपनगर परिसरातील एअर फोर्स वसाहतीजवळ बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.
पोलिस आणि वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, उपनगर एअर फोर्स वसाहतीच्या आसपास गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे एअर फोर्स वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. लष्कराची जागा असलेल्या या भागात मोठमोठ्या संरक्षक भिंती आहेत. तरीही या भागात पूर्वीपासून वन्यजीवांचा वावर आहे. या वन्यजीवांना संरक्षक भिंतीमुळे बाहेर जाण्यास जागा नाही. त्यामुळे.वन विभागाने शनिवारी (१२ फेब्रुवारी) वसाहतीलगत पिंजरा लावला. आज सकाळी पिंजराच्या दिशेने डरकाळीचा आवाज येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिस व वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेला हा बिबट्या साडेचार वर्षांचा असून नर जातीचा असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. दरम्यान, बिबट्या पकडल्या गेल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.