नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील उंटवाडी पुलाचा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. या उड्डाणपुलासाठी शेकडो वृक्षांची कत्तल होणार असल्याने यापूर्वीच हा प्रश्न वादग्रस्त ठरला आहे. तसेच, तब्बल २०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाडही तोडावे लागणार असल्याने ही बाब राज्यातच गाजली. अखेर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशकात येऊन या झाडाची आणि रस्त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. अखेर हा उड्डाणपूल साकारण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या. आता यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सांगितले आहे की, नाशिक महानगरपालिकेतर्फे मायको सर्कल, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक अशा प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे. सदर उड्डाणपुल त्वरित रद्द करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तत्कालीन मनपा आयुक्तांना आणि पालकमंत्र्यांना गेल्या वर्षी निवेदन दिले. त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या नाशिककरांना न्याय मिळण्यासाठी मनसेने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता व न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांनी जनहित याचिका (PIL (ST) / 7860/2022 (C) श्री. दिलीप दत्तु दातीर विरुद्ध नाशिक महानगरपालिका, द्वारा मा. आयुक्त व इतर) दाखल करून घेतली आहे. या याचिकेत काही मागण्या केल्या आहेत. त्यात उड्डाणपुलाची निविदा आणि कार्यारंभ आदेश तात्काळ रद्द करावा, याठिकाणी उड्डाणपुलाची खरोखरच गरज आहे का हे तपासण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, जनहित याचिकेवर निर्णय येईस्तोवर उड्डाणपूलाच्या बांधकामास स्थगिती द्यावी, नाशिककरांच्या करातून येणाऱ्या पैशातील तब्बल ३०० कोटींची अवाजवी उधळपट्टी थांबवावी, भ्रष्टाचारास आळा घालावा यांचा समावेश आहे.