नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून हवामानात प्रचंड मोठा बदल होत आहे. विशेषतः आठवडाभरापासून कधी थंडी तर कधी ढगाळ हवामान यामुळे वातावरणात फरक जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे सर्व परिसरात पावसाच्या सरी बरसल्या त्यानंतर आज दि. १४ डिसेंबर दुपारनंतर नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची मोठी दाणादण उडाली, परंतु शेतकरी वर्ग या बेमोसमी पावसामुळे चांगलाच धास्तावला आहे. कारण आता रब्बीचा हंगाम सुरू झाला असून कांदा, गहू, हरभरा या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला आणि द्राक्ष बागा यांचेही मोठे नुकसान होत आहे. टमाटा आणि डाळिंब पिकाचे प्रचंड हानी होणार आहे
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाल्याने मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे आज बुधवारी सकाळपासूनच आकाश ढगालेलेल होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तुरळक पाऊसाला सुरूवात झाल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बेमोसमी पावसाला जोरदार सुरुवात झाली. विशेषतः नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी या तालुक्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. सिन्नर तालुक्यात काही भागात पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, गिरणारे, दरी, मातोरी, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद आदी भागात जोरदार हजेरी लावली. तसेच नाशिकरोड, सिडको, , गंगापूर रोड आदी परिसरात देखील या बेमोसमी पावसाने हजारी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चांगलाच चितेंत आहे.
यंदा चार महिने पावसाने संपूर्ण राज्यात चांगलीच बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ही राज्यभरात प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरला पावसाने विश्रांती घेतली आणि थंडीला थोडी सुरुवात झाली. परंतु डिसेंबर उजाडताच पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झाला असून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात पुन्हा एकदा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हिवाळा सुरु असला तरी गेल्या काही दिवसांपासून थंडी पळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी मालेगाव व सटाणा भागातही पाऊस झाला. नाशिक शहर व परिसरात सायंकाळी काही भागात जोरदार पाऊस पडल्याने अनेक छोट्या-मोठ्या दुकानदारांचे नुकसान झाले. पंचवटी परिसरात आठवडे बाजारमधील शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली. भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने ओली झाली असून भाजीपाला वाहून गेला आहे. बाजारात खरेदी करायला आलेले ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली.
ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी देखील प्रतिकूल हवामान व बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. या वातावरणाचा द्राक्षबागा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून डावणी व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. नाशिकसह जिल्ह्यात अनेक भागात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अगोदरच द्राक्षबागांसाह शेतमालावर विपरीत परिणाम होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. त्याचप्रमाणे वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, थंडी – ताप यासारख्या आजारांमध्ये देखील वाढ झाली आहे.
https://twitter.com/TheJournalistDD/status/1602997510670520320?s=20&t=vFVcR-gM0X9Uec38sBAWNQ
Nashik Unseasonal Rainfall Today Agri Threat
Rabi Crop Vegetables