नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ता ओलांडत असतांना दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या धडकेत एका चालकासह वृद्धेचा मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील गौळाणे फाटा येथे झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यात आठ वर्षीय बालकाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताराबाई रामकृष्ण वडनेरे (वय ६०, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) व गणेश किसन वाघ (वय २७, रा. कावनई, ता. इगतपुरी) अशी मृतांची नावे असून या अपघातात रूपेश देविदास सोनवणे व राहूल गणेश वडनेरे हा बालक जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी रूपेश सोनवणे (रा.भोर टाऊनशिप,अंबड सातपुर लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे आणि मृतवृध्दा एकमेकांचे नातेवाईक आहेत. ताराबाई वडनेरे या आपला आठ वर्षीय नातू राहूल वडनेरे यास सोबत घेवून सोनवणे यांच्या घरी पाहूण्या म्हणून आल्या होत्या. मंगळवारी (दि.२५) सायंकाळी रूपेश सोनवणे हा आजी नातवास कपडे खरेदी करण्यासाठी गौळाणे फाटा येथील डी मार्ट मॉल येथे आपल्या दुचाकीवर एमएच १५ जीई ५०१९ ट्रिपलसिट घेवून गेला होता.
कपडे खरेदी करून रात्री नऊच्या सुमारास तिघे घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. सोनवणे मॉल समोरील महामार्ग ट्रीपलसिट ओलांडत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या मोटारसायकला धडक दिली. या अपघातात ताराबाई वडनेरे जागीच ठार झाल्या तर तिघांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता पुढील दुचाकीस धडक देणारा मोटारसायकलस्वार गणेश वाघ याचाही उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत चालकाविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.