त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिध्द असलेल्या पहिणे घाटामध्ये रविवारची सुटीचा आनंद घेण्यासाठी आज पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी गर्दि करुन पर्यटनाचा आनंद लुटला. सध्या मान्सुनने देशाचा बहुतेक भाग व्यापला आहे. कोठे ढगफुटीमुळे कहर, कोठे पुरामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे तर ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलोट गर्दी करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबक – घोटी रोडवर पहिणे घाट निसर्ग सौदर्यासाठी प्रसिध्द आहे. पावसाला सुरुवात झाली की, अंजंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरां वरुन असंख्य धबधबे कोसळतात. त्यामुळे हे धबधबे सुरु झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. शनिवार रविवार तर गर्दिचा उच्चांक असतो. आज सकाळपासुनच पर्यटकांची गर्दि वाढु लागली. पहिणे परिसरात शेकडो चारचाकी, दुचाकींची गर्दी झाली होती. बर्याच वेळा वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफीक जामचा अनुभव आला. कासवगतीने वाहनांची रांग पुढेपुढे सरकत होती.
अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला. तसेच भाजलेले मक्याचे कणसं आणी वाफाळत्या चहाची तडाखेबंद विक्री झाली. नेकलेस धबधब्या परिसरात जाण्यासाठी वनविभागातर्फे प्रवेश शुल्क घेण्यात आले. याठिकाणी आजच्या दिवसभरात सत्तर हजार रुपये जमा झाले.
गर्दीच्या मानाने पोलीसांचा बंदोबस्त अगदी तोकडा होता. काही तरुणाईने नशापाणी करुन धुडगुस घातल्याने परिवारा सोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. तर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याने एक पर्यटक जखमी झाला. किमान शनिवारी रविवारी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी, अशी मागणी होत आहे. याच बरोबर हरिहर किल्ला, दुगारवाडी धबधबा आदी ठिकाणीही पर्यटकांनी मोठी गर्दि केली होती.